लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव ( प्रतिनिधी ) : शेअर मार्केटच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगार तरुण तसेच गोरगरिबांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून पसार झालेला रावतळे कुरडगाव, ( ता. शेवगाव ) येथील साई कवडे या भामट्याला अहिल्यानगरच्या एलसीबी पथकाने गुजरात मधून मुसक्या आवळून अटक केल्याचे विश्वसनीय वृत्त असून, या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी कवडे याला शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. फसवणूक झालेल्या अनेकांनी यापूर्वी कवडे याच्या विरोधात शेवगाव पोलिसात तक्रारी दाखल केलेले आहेत. दरम्यानच्या काळात तो पसार झाला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली गोरख धंदा करून गोरगरिबांना फसवणारे अनेक भामटे गावोगावी असून, ते उजळ माथ्याने फिरत आहेत. तर, अनेकजण यापूर्वीच पसार झाले आहेत. कवडे याच्या अटकेमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले.
0 टिप्पण्या