१३ मार्चला शानदार उद्घाटन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव ( विशेष प्रतिनिधी ) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहिल्यानगर जिल्हा खोखो संघटना यांच्या मान्यतेने तसेच शेवगाव बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान व न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगावच्या खंडोबा मैदानावरील किरण - कार्तिक क्रीडा नगरीत गुरुवार दि. १३ ते रविवार दि. १६ मार्च दरम्यान ६० वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुरुष व महिला अशा ४८ संघातून ७२० खेळाडू तसेच व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच मंडळ व तांत्रिक मंडळ संघटनेचे १०० पदाधिकारी व ९० निवड समिती सदस्य व स्वयंसेवक असे एकूण १ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सुमारे दीड हजार प्रेक्षकांना गॅलरीमध्ये बसून महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो या अस्सल खेळाचा आनंद घेता येईल. क्रीडा रसिकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एलईडी स्क्रीन तर, संपूर्ण भारतभर यूट्यूब द्वारे दोन वाहिन्यानमार्फत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सकाळी साडेसात ते दहा व सायंकाळी पाच ते रात्री दहा या दोन सत्रात होणार आहे. खोखो विश्वचषक विजयी पुरुष व महिला कर्णधार संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर व प्रियंका इंगळे व भारताच्या संघातील अनेक पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि.१३ मार्चला सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी पंकज आशिया व प्रवरा मेडिकलचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार मोनिकाताई राजळे भूषविणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सचिव डॉ. इंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, उपाध्यक्ष अशोक पितळे, खजिनदार एडवोकेट गोविंद शर्मा, जिल्हा खोखो संघटनेचे सचिव रावसाहेब गोपाळ, जिल्हा खो-खो अध्यक्ष एडवोकेट विश्वासराव आठरे पाटील, क्रीडा व सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, पीएमटी शैक्षणिक संकुल शेवगावच्या सहसचिव मोनिका सावंत - इनामदार, कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर, क्रीडा व सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, प्रांताधिकारी प्रसाद मते, डीवायएसपी सुनील पाटील, तहसीलदार प्रशांत सांगडे व उद्धव नाईक, पीआय समाधान नागरे, मुख्याधिकारी विजया घाडगे व संतोष लांडगे, बिडिओ अजित बांगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश उर्फ रिंकू फलके, गणेश रांधवणे, सागर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण वाघ, रमेश लव्हाट, निलेश झिरपे, दीपक काटे, विशाल गर्जे, बबन गायकवाड, सचिन वाल्हेकर, विष्णू आधाट, गणेश वावरे, गणेश ढोले, राम छडीदार, सचिन तहकीक, सचिन सातपुते आदींसह अनेक माजी राष्ट्रीय खेळाडू परिश्रम घेत आहेत.
0 टिप्पण्या