जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई/अहिल्यानगर: राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्थेसह अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा, त्यामुळे सिंचनक्षमता वाढीस मदत होईल या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री विखे पाटील यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अप्पर सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे कार्यकारी संचालक संतोष किरणनवार, मुख्यअभियंता तथा सहसचिव अभय पाठक, संजीव टाटू, अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील पुढे म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या सिंचनाच्या कामांना गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. बांधकामाधीन प्रकल्पाची कामे जलद गतीने व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करावी. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. सिंचन प्रकल्पांच्या नवीन कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता लवकर मिळाव्यात, त्यासाठीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून तातडीने पाठवावेत. सिंचन प्रकल्पाचे कामे लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट कामे मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत. 100 दिवसांच्या कालावधीत घेण्यात येणाऱ्या कामांचे सुयोग्य नियोजन करावे.
अशा विविध सूचनाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी केल्या.
0 टिप्पण्या