वाहन चालकाकडून ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची फसवणूक; गुन्हा दाखल
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर : व्यापाऱ्याकडे पोहोच करण्यासाठी दिलेल्या सुमारे सव्वा सहा लाख रुपये किमतीच्या 12 टन कांद्याची मालट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावत नगरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एमआयडीसी येथील दिल्ली हरियाणा रोडलाईन ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक नवीनकुमार चौधरी (मूळ रा. रामगड, राजस्थान, हल्ली रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते संपूर्ण देशभरात मालाची वाहतूक करत असतात. त्यांच्याकडे राजस्थानच्या जयपूर येथील राजधानी ट्रेडिंग कंपनी यांना 12 टन कांदा पोहोच करण्याचे काम मिळाले. त्यानुसार त्यांच्या कार्यालयात मालट्रक चालक सुरेंद्र भीमसिंग पुनीया (रा. फत्तेहबाद, हरियाणा) हा मालट्रक घेऊन आला व मी सदरचा कांदा जयपूर येथे पोहोच करतो, असे म्हणाला. फिर्यादी आणि चालक पुनिया यांची ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या निमित्ताने ओळख असल्याने त्यांनी विश्वासाने त्यांच्याकडे 6 लाख 24 हजार रुपये किमतीचा 12 टन कांदा जयपूरला पोहोचण्यासाठी दिला.
मात्र त्याने हा कांदा जयपूर येथे पोहोच न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावून ट्रान्सपोर्ट कंपनीची आर्थिक फसवणूक केली आहे. मालट्रक चालक पुनिया याच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने शेवटी व्यवस्थापक नवीनकुमार चौधरी यांनी सोमवारी (दि. 6) रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मालट्रक चालक सुरेंद्र भीमसिंग पुनिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हे. कॉ. नेहूल करत आहेत.
0 टिप्पण्या