Ticker

6/Breaking/ticker-posts

शिरसाटवाडी येथील दगडफेकीचा प्रकार म्हणजे राजळेंची निव्वळ स्टंटबाजी: अॅड. प्रताप ढाकणे




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी/  खरवंडी कासार  :       "आम्ही भाजलेले कोंबडे आहोत, आगीला भीत नाही". गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना बरोबर घेऊन फिरता. आम्हाला जातीयवादी म्हणून जातीपातीचे राजकारण तुम्ही स्वतः करता. पराभव दिसू लागल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शिरसाटवाडी येथील दगडफेकीचा प्रकार म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून मतदारांची दिशाभूल करण्याचा दिवसभरातील शेवटचा प्रयत्न तुम्ही शिरसाटवाडी येथे केला. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केला. 

        बुधवारी सायंकाळी शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर जास्त वेळ बसून राहण्यावरून दोन गटांमध्ये तणाव वाढून काही अज्ञात कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यामध्ये दुखापत होऊन आपल्याला कोंडून घेतले,असा आरोप आमदार राजळे यांनी केला. बंदोबस्तावरील पोलीस अथवा आमदारांनी गुन्हा नोंदविला नसल्याने या प्रकरणामागील गुढ  वाढले आहे.  याबाबत अॅड. ढाकणे यांनी  दि. 21 रोजी पत्रकार परिषद घेऊन  प्रकरणामागील राजकारण उघड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, संदीप राजळे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रभावती ढाकणे, देवा पवार, अक्रम अतार, योगेश रासने, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले, कोणतीही निवडणूक आली की शहराची दिशाभूल करण्यासाठी शिरसाटवाडीला पुढे केले जाते. गेल्या वीस वर्षात ते लोक एका तरी प्रकरणात दाखवा. तेथील लोकांनी बेकायदा सावकारी करून लोकांचे संसार उध्वस्त केले काय ? प्लॉट, जमिनी हडप केल्या काय? गुंडगिरी करत व्यापाऱ्यांचे गल्ले लुटले काय? व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटले काय? असे प्रश्न विचारले. व्यापाऱ्याला मारहाण केली ते दाखवा. वाडीचे रहिवासी गुंड आहेत, अशी प्रतिमा करत सर्वत्र त्यांची तुम्ही बदनामी केली. राजकीय स्वार्थासाठी सर्व मूल्य तुम्ही पायदळी तुडवले. गेल्या दहा वर्षात तुम्ही अतिशय घाणेरडे राजकारण केले.  चुकीचे काम आपण करायचे व बदनाम इतरांना करायचे, डांगेवाडी, कासार पिंपळगाव, ढवळवाडीतील जे  गुंड तुमच्याजवळ बसले आहेत, त्यांचे उद्योग आम्ही बंद करणार आहोत, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. 

 मतदानाच्या दिवशी काळ्या रंगाच्या सात गाड्या भरून गुंड  घेऊन आपण भारजवाडीच्या बुथवर गेलात. अधिकाऱ्यांना सांगता कमळाचे बटन दाबा. तेथे सुरू असलेली अरेरावी प्रभावती ढाकणे यांनी धाव घेऊन बंद केली. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची निवडणूक आयोगाकडे आपण मागणी केली आहे. विशिष्ट भागात गोंधळ घडवून आणून तुमच्या पारड्यात मते मिळवायचे तुमचे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही. मालेवाडी, ढाकणवाडी, चुंबळी टाकळीमानुर या भागात गोंधळ घालून मतदान आपल्या बाजूने वळवण्याचे तुमचे नियोजन होते. स्वतः वाद उत्पन्न करून मतदान प्रक्रियेत गोंधळ घालून फेर मतदानाची मागणी करण्याचे तुमचे डावपेच उघड झाले. 

गुंडांचा ताफा घेऊन फिरण्याची गरज तुम्हाला का वाटली? शिरसाटवाडी येथे तुम्ही मतदान केंद्रात बसून राहू नका अशी विनंती कार्यकर्ते, अधिकारी व पोलिसांनी केली. तुम्ही कोणाचीही ऐकले नाही. तरुणांनी घोषणा दिल्या. मतदार व कार्यकर्त्यांवर दडपण आणू नका. वातावरण बिघडत असल्याकडे तुमचे लक्ष वेधले. तुम्ही त्यांचेही ऐकले नाही. तेथील प्रकार कळाल्यावर आपण पोलिसांना तेथे धाव घेण्याची विनंती केली. एक महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा अनादर करू नका. याबाबत कार्यकर्त्यांना आपण समजावले. पावणे सात वाजेपर्यंत तेथे तुम्ही ठाण मांडून बसता. गोंधळ झाल्यावर फोन करून गुंड बोलून घेतले. तुमच्याच कार्यकर्त्यांनी अरेरावीची सुरुवात केली. शिरसाटवाडीतील तुम्हाला त्रास देणारे कोणते गुंड होते,  हे तुम्ही सिद्ध केल्यास मी राजकारण सोडून देईन. असे आव्हान ढाकणे यांनी दिले. 

  स्वतःला कोंडून घेत  प्रसिद्धीचा स्टंट केला. स्थानिक समजदार लोकांमुळे तुमचा डाव फसला. सार्वजनिक जीवनात जातीयवादाच विष कालवणे बंद करा. आम्ही तुमची खरी कर्तबगारी लोकांपुढे आणायची का? तालुक्याची बदनामी करता असा खडा सवाल ढाकणे  यांनी  उपस्थित केला. 
         
यावेळी बोलताना प्रभावती ढाकणे म्हणाल्या, कालचा प्रकार हुकूमशाही सारखा  भारजवाडीत घडला. तुमचा तुमच्या कामावर विश्वास असेल, कोट्यवधींचा निधी तुम्ही मिळवला असे म्हणत असाल तर तुम्हाला विशिष्ट दोन गटातच का फिरावे लागले. ज्या पंकजाताईंच्या जीवावर तुम्ही मते घेतली, त्यांच्यावर सुद्धा तुमचा विश्वास नसल्याने तुम्ही त्यांचा प्रभाव असलेल्या दोन गटातच फिरत होता. भारजवाडी बूथवर स्टंटबाजी केली. कशासाठी गालबोट लावले ? दहा वर्षात त्यांनी पाथर्डीचे नाव बदनाम केल. पाथर्डीची परिस्थिती बिहार सारखी केली. का नाही तुमच्या पट्ट्यात जाऊन तुम्ही बसलात. माझ्या मागे त्यांच्या आठ गाड्या होत्या. माझी मात्र एकच गाडी होती. मी जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांचा ताफा माझा पाठलाग करत होता,  मला सुद्धा दहशत वाटली. कोणत्या समाजावर प्रतापरावांनी कधी दहशत केली नाही. प्रतापराव रडून मते मागत आहेत, असे तुम्ही म्हणता. तुम्ही सुद्धा 10 वर्षे रडूनच मते मागितली. आता तुमच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने तुमची भावनिकता संपली काय. तुमच्याविषयी स्त्री म्हणून आदर होता. पण कालची तुमची देहबोली अतिशय विचित्र होती. अरेरावीची भाषा तुम्ही केलीत.  लोकशाहीची बुज कोठेच बाळगली नाही. असे लोक निवडून आल्याने तालुक्याचे नुकसान झाले, अशी टीका त्यांनी आमदार राजळेंवर केली.  

दरम्यान पाथर्डी शहर व परिसरात तणावाची परिस्थिती कायम असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे .आचारसंहिता असल्याने रात्री उशिरा राजळे समर्थकांनी पाथर्डी बंदचा निर्णय मागे घेतला, मात्र आज कासार पिंपळगाव या आमदार राजळे यांच्या गावी ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढत आमदार राजळे यांना संरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान  या सर्व घडामोडीच्या अनुषंगाने अॅड.  ढाकणे  यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या