लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (जगन्नाथ गोसावी ) : विद्यमान आमदारांनी दहा वर्षात शेवगाव तालुक्याची माती केली. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत तसेच तालुक्यात कोणतेही मोठे प्रकल्प आले नाही. घुले परिवाराला सत्तेची हाव नाही. जनतेच्या प्रपंचासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत परिवर्तन अटळ असून चंद्रशेखर घुले हे निश्चित आमदार होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे त्यांच्या पाठीशी ताकद उभी करून विजयाचे शिल्पकार होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन लोकनेते श्री मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा जेष्ठ मापाडी कुंडलिक चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच दिवाळी - पाडवा फराळ व कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात श्री. घुले पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते.
जनतेच्या कायम सोबत राहुन सुखदुःखात सहभागी होणारे मारुतराव घुले पाटील यांनी अखेरचा श्वास शेवगावच्या मातीत घेतल्याचे सांगून श्री. घुले पाटील पुढे म्हणाले, तुलनात्मक दृष्ट्या शेवगाव तालुक्यातील मतदारांची संख्या पाथर्डी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेवगावच्या मातीतला माणूस आमदार झाला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन तन-मन-धनाने झोकून काम केल्यास चंद्रशेखर घुले पाटील यांचा विजय निश्चित आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे ते आमदार होणार असल्याने तुम्ही सर्वजण आमदार होणार आहात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची चंद्रशेखर घुले पाटील व क्षितिज घुले पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटी संदर्भात बोलताना ते म्हणाले, श्री. पवार साहेबांमुळेच मी व चंद्रशेखर घुले पाटील आमदार झालो. त्यांच्याशी घुले परिवाराचे स्नेहाचे संबंध आहेत. काँग्रेस पक्षाची छकले उडाल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला. या पक्षाचा सर्वप्रथम जिल्ह्यात खांद्यावर झेंडा घेणारे मारुतराव घुले पाटील हे एकमेव नेते होते.
आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून श्री. घुले पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात त्यांनी शेवगाव तालुक्यात कोणतेही भरीव विकासाचे काम केले नाही. त्यामुळे तालुक्याची माती झाली. ताजनापूर टप्पा क्रमांक १ व २ ची कामे माझ्या व चंद्रशेखर घुले पाटील यांच्या कार्यकाळात मार्गी लागली तसेच मुळा कालवा नूतनीकरण कामासाठी भरीव निधी आणला. अनेक नवीन वीज सबस्टेशन उभे केले. शेवगाव तालुका हा अवर्षण प्रवण तालुका असून येथे विकासासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. चंद्रशेखर घुले पाटील आमदार झाल्यानंतर जायकवाडी धरणातून शेतीला पाणी व शेवगावला एमआयडीसी हा आपला अजेंडा आहे.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले की, सध्या अनेक वावड्या उठत असून कोणीहीअफवांवर विश्वास ठेवू नये. मी निवडणूक लढवणारच. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विजय आपलाच आहे. कार्यकर्त्यांनी आपापली गावे सांभाळून आपल्याला ७५ टक्के मतदान घडवून आणावे तसेच या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेत विनाकारण घुटमळू नये, त्यांनी वेळीच बाहेर पडावे, असा निर्वाणीचा सल्ला श्री. घुले यांनी दिला.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, गहिनीनाथ कातकडे, ताहेर पटेल, मोहनराव देशमुख, निवृत्ती दातीर, माणिकराव थोरात, शिवाजीराव भुसारी, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. क्षितिज घुले पाटील, संजय फडके, भास्कर खेडकर, संजय फडके, अरुण घाडगे, विष्णुपंत घनवट, भाऊराव भोंगळे, अनिल इंगळे, संदीप मोटकर, बाळासाहेब मुंदडा आदींची समयोचित भाषणे झाली. पंडितराव भोसले यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले.
0 टिप्पण्या