लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : विजयादशमीला येत्या शनिवारी (दि. १२ रोजी) राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट, (जि. बीड) येथील भगवान भक्ती गडावर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी केले आहे.
दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी शेवगाव येथे श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचे प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. मुंडे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील तमाम ऊस तोडणी मजुरांचे आधारस्तंभ व प्रेरणास्त्रोत राहिलेले दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा भाजपा नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांनी पुढे अखंडपणे चालू ठेवली.भक्ती व शक्तीचा संगम असलेल्या या मेळाव्यातून स्व. मुंडे यांनी बहुजनांचे नेतृत्व केले तसेच समाजाला नवी दिशा व ऊर्जा देण्याचे काम प्रभावीपणे केले. त्यांच्याच विचाराचा वसा व वारसा आ.पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच ताकतीने, तळमळीने पुढे चालू ठेवला आहे.
या दसरा मेळाव्यातून त्या विचाराच्या सोन्याची देवाण-घेवाण करणार असल्याने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील जनतेने या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या