Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. मोनिका राजळे यांना उमेदवारी ; शेवगाव - पाथर्डीत राजकीय भूकंप




     











लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


शेवगाव ( विशेष प्रतिनिधी ) : २२२, शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध असतानाही भाजपाच्या नेतृत्वाने उमेदवारी बहाल केल्याने शेवगाव व पाथर्डी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून नाराजी नाट्यास प्रारंभ झाला आहे. श्रीमती राजळे यांना उमेदवारी दिल्याच्या उदवेगातून भाजपाच्या सुमारे २०० ते २५० पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे सुपूर्द केल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी सांगितले.

      आ. राजळे या पक्षपातीपणा करत असून निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देत नसल्याने त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड तसेच भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी वारंवार पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या मतदारसंघातून श्री. मुंडे व श्री. दौंड उमेदवारीसाठी दावेदार होते. मात्र, त्यांच्या या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करून भाजपा नेतृत्वाने पुन्हा तिसऱ्यांदा राजळे यांना उमेदवारी बहाल केल्याने शेवगाव -  पाथर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे.

      श्री. मुंडे, श्री. दौंड, व श्री. वैद्य या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे भाजपा पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याने त्याचे दूरगामी परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. हे सर्व प्रमुख कार्यकर्ते भाजपाचा ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. या  राजीनामा नाट्यामुळे भाजपा पक्षांतर्गत कलह निर्माण झाला असून प्रचंड फूट पडली आहे, त्यामुळे आ.राजळे यांना ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
  दोन दिवसात निर्णय घेणार :  मुंडे 
आ.मोनिका राजळे यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध असतानाही नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिल्याने येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
- अरुण मुंडे, प्रदेश सचिव, भाजपा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या