पाथर्डी दि. ४ : पक्षाचे काम आम्ही करायचे, अन सत्ता मात्र तुम्ही उपभोगायची हे येथून पुढील काळात चालणार नाही. त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी, अन्यथा प्रसंगी जनतेच्या आशिर्वादावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा खणखणीत इशारा जिल्हा भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिला.
दौंड व भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आज पाथर्डीत विजय लॉन्स येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यापूर्वी शक्तिप्रदर्शन करत दोन्हीही नेते मेळाव्याच्या ठिकाणी आले. या वेळी शेवगाव भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, , बाळासाहेब सोनवने, माजी सभापती सुनीता दौण्ड, उदय मुंडे, उद्योजक भीमराव फुंदे, दीपक जाधव, शिवसंग्राम इसरवाडे,भूषण देशमुख, सतीश मासाळकर, बाळासाहेब खोरदे, बाळासाहेब कोळगे, गुरुनाथ माळवदे, सतीश मगर हे उपस्थित होते.
मेळाव्याकडे राजळे समर्थकांनी पाठ फिरवली तर दौंड व मुंढे यांनी राजळे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांच्यावर घणाघाती टीका केली.
या वेळी पुढे बोलताना दौंड म्हणाले कि, तिन्हीही घराण्याकडे अनेक वर्षांपासून सत्ता आहे मात्र आजही पाणी, बेरोजगारी हे प्रश्न सुटलेले नाही. सरपंच ते आमदार पदापर्यंतचे सर्व पदे यांना यांच्याच घरात ठेवायची असून आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आता सर्वसामान्य माणसाच्या हातात सत्ता येणे गरजेचे आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता आमची पाठराखण करा. सासरे, पती आमदार होते व तुम्ही सुद्धा दहा वर्षांपासून आमदार असताना मतदारसंघातील प्रश्न जैसे थे आहेत. दिवसरात्र आम्ही जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असून या वेळी भाजपने मुंढे किंवा मला उमेदवारी द्यावी अशी मागणी दौंड यांनी केली.
या वेळी बोलताना. मुंढे म्हणाले कि, निष्ठावंतांना न्याय देण्याची वेळ आता आली आहे. ज्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. त्यांना आम्ही डोक्यावर घेतले. आम्ही उमेदवारी मागतो तर काहींच्या पोटात गोळा यायला लागला आहे. सर्व पदे तुमच्याच घरात ही लोकशाही नाही. दहा वर्षात मोठा विकास केला म्हणता , जो काही विकास केला तो तुमच्या खिशातून केला नसून शासनाच्या निधीतून केला आहे. दहा वर्ष हे कुणाला भेटले नाही. मात्र निवडणूक तोंडावर आल्याने दोन महिन्यात आता हे फिरायला लागले. सतरा पक्ष फिरून आले अन आता हे डोक्यावर बसले असून हिम्मत असेल तर त्यांनी सर्वसामान्यांना उमेदवारी द्यावी, असे आव्हान शेवटी मुंढे यांनी दिले. गुरुनाथ माळवदे यांनी आभार मानले.
भाजपची उमेदवारी कोणाला ?
दौंड यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमधील वाद निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला आहे. अरुण. मुंढे व गोकुळ दौंड यांनी शेवगावसह पाथर्डीत मेळावे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे .
0 टिप्पण्या