लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे व विधानसभेच्या संभाव्य इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यात श्रेयवादाच्या लढाईवरून कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. शेवगाव शहर पाणी पुरवठा योजना जनशक्ती विकास आघाडीच्या नगर परिषद कार्यालयावरील ' मुक्काम ठोको ' आंदोलनामुळे मार्गी लागली, असे सांगत सौ. काकडे यांनी या आंदोलनाचे श्रेय शेवगाव शहर नागरिक कृती समितीला दिले असून ' संघर्ष जनतेचा, उद्घाटन जनतेकडून आणि श्रेय ही जनतेचे ' या स्लोगन च्या भूमिपूजन सोहळ्याचे फलक व निमंत्रण पत्रिका फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करुन गुरुवारी (दि. ३ रोजी) घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी शेकडो महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेवगावच्या कोरडे वस्ती रोडवरील विवेकानंद कॉलनीत भूमिपूजन उरकले .
सौ. काकडे स्थानिक रहिवाशांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याची वार्ता समजताच आमदार मोनिका राजळे यांनी शेवगावमध्ये मोजक्या पत्रकारांना निमंत्रित करून पत्रकार परिषद घेत आपण शासनाकडून शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान योजनेतून ७२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली.
या योजनेचे भूमिपूजन उद्या शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आ.राजळे यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नळ पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादाची खमंग चर्चा सध्या शेवगावमध्ये सुरु आहे. दरम्यान,आणखीन बऱ्याच गोष्टी अर्थात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी निवडणूक प्रचारादरम्यान मतदार राजाला ऐकायला, पहायला मिळतील.
0 टिप्पण्या