Ticker

6/Breaking/ticker-posts

मला, आमदार झाल्यासारखं वाटतंय.., शेवगावमधून विक्रमी ४७ अर्ज दाखल


    

लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (विशेष प्रतिनिधी) : २२२, शेवगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी १६ जणांनी २२ नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे या मतदारसंघात आजवर एकूण ३६ जणांचे ४७ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजय मते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत सांगडे व उद्धव नाईक यांनी दिली. 
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवगाव तहसील कार्यालयाचा परिसर समर्थक कार्यकर्त्यांच्या गर्दीने व प्रचंड घोषणाबाजीने दणाणून गेला. काही काळ शेवगाव - अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. राजळे -  ढाकणे समर्थक समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणा युद्ध पहावयाला मिळाले.

      भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रताप ढाकणे यांनीही दिव्यांग, माजी सैनिक तसेच सर्व धर्मीय प्रतिनिधींना सोबत घेत शक्ती प्रदर्शन करत दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री. ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुद्वादशीचे औचित्य साधून येथील नगर रस्त्यावरील वैशंपायन नगर मधील सद्गुरु श्रीदत्तात्रेय व योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन मूर्तीचे दर्शन घेतले. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनीही आज नव्याने पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

      याआधी आमदार राजळे, प्रताप ढाकणे, सौ. प्रभावती ढाकणे, माजी आमदार श्री. घुले, वंचितचे किसान चव्हाण, जनशक्ती विकास आघाडीचे विद्याधर काकडे व  सौ. हर्षदा काकडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची ही पहिलीच वेळ असून, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येकालाच आता आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहे.

      आज अर्ज दाखल केलेल्यांमध्ये संदीप गोरक्षनाथ शेलार, शिवहार पुंजाराम काळे, अंकुश भीमराव चितळे, आत्माराम किसन कुंडकर, चंद्रकांत भाऊसाहेब लबडे, सुधाकर रामभाऊ चोथे, प्रताप बबनराव ढाकणे, चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील, एकनाथ विष्णू सुसे, सुहास झुंबर चव्हाण, तुळशीराम नामदेव पडळकर, सुभाष त्रिंबक साबळे, मोनिका राजीव राजळे, इनुस चांद शेख, स्नेहल दत्तात्रय फुंदे, बाळू बाबुराव कोळसे, अमोल सूर्यभान देवरे, अर्जुन कुंडलिक वारे, उद्धव तुकाराम माने, निलेश प्रमोद बोरुडे या 16 जणांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या