Ticker

6/Breaking/ticker-posts

"कौशल्य प्रशिक्षणा"च्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती: शिवाजीराव कर्डिले


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ. नगर: "कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या  माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती शक्य असुन त्या दृष्टीने साक्षी फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला महिला प्रशिक्षणाचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे." असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. 

बुऱ्हानगर येथील साक्षी फाऊंडेशनने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मोफत महिला प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी श्री. कर्डिले बोलत होते. यावेळी कौशल्य विकास समितीचे सदस्य आणि भाजप नेते श्री. विनायक देशमुख, साक्षी फाउंडेशनच्या संचालिका पूजा देशमुख, बुऱ्हानगरचे सरपंच श्री. रावसाहेब कर्डिले, उपसरपंच श्री जालिंदर जाधव, फोनिक्स कन्सल्टन्सीचे श्री. अनंत कुलकर्णी, बाणेश्वर गृहनिर्माण संस्थेचे सचिव श्री.अ.ना. पावले, श्री. रवींद्र कर्डिले श्री‌. रंगनाथ कर्डिले, ग्रामविकास अधिकारी श्री. एस. आर. शेळके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

साक्षी फाउंडेशनच्या वतीने बुऱ्हानगर व परिसरातील 200 महिलांना फॅशन डिझायनिंग, एम्ब्राॅयडरी व आरीवर्कचे मोफत प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
 प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. कर्डिले म्हणाले," विनायक देशमुख यांचा कौशल्य विकास क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बुऱ्हानगर येथील महिलांसाठी सुरू केलेला कौशल्य विकासाचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने बुऱ्हानगर ग्रामपंचायत त्यांना सर्व सहकार्य करील."

यावेळी बोलताना कौशल्य विकास समितीचे सदस्य श्री. विनायक देशमुख म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर कौशल्य विकासाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून या माध्यमातूनच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल आणि ग्रामीण  व्यवस्थेला बळकटी मिळेल. या संधीचा महिला आणि युवकांनी उपयोग करून आपले भवितव्य उज्वल करावे."
 
प्रास्ताविक करताना पूजा देशमुख म्हणाल्या, "आज सुरू होत असलेला प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा महिलांच्या आर्थिक उन्नतीच्या प्रवासातील पहिला टप्पा असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या घरीच काम करता येईल, अशी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी हे प्रशिक्षण अत्यंत लक्षपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करावे."
 
फोनेक्स कन्सल्टन्सीचे श्री. अनंत कुलकर्णी म्हणाले, "साक्षी फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या प्रशिक्षणातील महिलांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण होण्यासाठी आणि आवश्यक ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फोनिक्स कन्सल्टन्सी सहकार्य करेल."

यावेळी सरपंच श्री. रावसाहेब कर्डिले, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.आर.शेळके यांचीही भाषणे झाली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली जाधव     यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या