लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
गोरखपूर /नगर - गोरक्षनाथांची तपोभूमी असलेल्या उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात नगर शहरातील नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद सदाशिव चवंडके यांना सलग दुसऱ्यांदा विशेष निमंत्रित वक्ता म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. गोरक्षनाथ पीठाधिश्वर तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन मिलिंद चवंडके यांच्या बीज भाषणाने झाले. नाथ संमेलनाच्या मुख्य विषयावर झालेले हे बीज भाषण संमेलनातील लक्षणीय सहभागाची नोंद करणारे ठरले. विशेष म्हणजे मिलिंद चवंडके यांनी लिहिलेली || श्रीकानिफनाथमाहात्म्य || ही शुध्द मराठीतील रसाळ ओवीबध्द पोथी योगी आदित्यनाथांच्या हाती स्वहस्ते दिली.
दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालय गोरखपूर आणि हिन्दुस्तानी अकॅडमी उत्तर प्रदेश प्रयागराज यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय नाथ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. समरस समाज निर्मितीत नाथपंथाचे योगदान हा संमेलनाचा मुख्य विषय होता.
उद् घाटन सोहळ्यास गोरखपूर विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रो. पुनम टण्डन, अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विश्वविद्यालयाचे कुलपती प्रो. श्रीप्रकाशमणि त्रिपाठी, प्रयागराज येथील हिन्दुस्तानी अकॅडमीचे कार्यकारी अध्यक्ष श्री जितेंद्र कुमार, सचिव डॉ. देवेंद्रप्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाच्या सत्राचा शुभारंभ मिलिंद चवंडके यांनी संमेलनाच्या मुख्य विषयानेच केल्याने संयोजकांसह उपस्थित संत-महंत, अधिकारी, विव्दज्जन, संशोधक, प्राध्यापक, नाथभक्त प्रभावित झाले. या शुभारंभी सत्राचे अध्यक्षस्थान ओरिसा येथील पूज्य संत श्री शिवनाथजी यांनी भूषविले. महायोगी गुरू श्री गोरक्षनाथ शोधपीठचे उप निदेशक डॉ कुशलनाथ मिश्रा, प्रा. डॉ.अरूणकुमार त्रिपाठी, प्रा. डॉ. अमित उपाध्याय, प्रा. डॉ. प्रदिप राव, प्रो. सूर्यकांत त्रिपाठी, डॉ. जयंत नाथ, प्रा. डॉ. रंजन लता, योगी हुकूम सिंह (राजस्थान), गिरीधारीनाथ (जोधपूर,राजस्थान), प्रो. भोलानाथ योगी (नेपाळ), डॉ. प्रफुल्ल नाथ (आसाम), प्रो. विनोद नाथ (सिमला, हिमाचल प्रदेश) यांच्यासह विविध प्रांतांमधून आलेले मान्यवर उपस्थित होते.
मिलिंद चवंडके म्हणाले, नाथपंथ सामाजिक समरसतेसाठी सदैव अग्रेसर रहिला. राष्ट्राची अखंडता आणि समरसतेसाठी नवनाथांनी आपल्या सिध्दांसह प्रभावीपणे योगदान दिले. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक, व्यावहारिक आणि नैतिक स्तरावर आजही नाथपंथ मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येते. नाथपंथी तत्त्वज्ञानातून सामाजिक समरसतेचेच दर्शन घडते. पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळते. कलियुगातील सकल मानवाच्या परम कल्याणासाठीच नऊ नारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. रोकड्या प्रचितीच्या अनुभूतीमुळेच नाथस्थलांकडे भाविकांचा ओढा वाढत चालला आहे. नाथपंथी कार्यामधून साधणारी सामाजिक समरसता एकसंघ आणि एकात्म समाज पुरुषाचे दिव्य दर्शन घडवते, असे मिलिंद चवंडके यांनी विविध दाखले देत सांगितले.
गोरखपूर येथे २०२१ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनातही मिलिंद चवंडके यांना विशेष निमंत्रित वक्ता म्हणून बोलावले होते. सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात सहभागी होत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाल्याने मिलिंद चवंडके यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या