Ticker

6/Breaking/ticker-posts

शारदीय नवरात्रोत्सवाची अमरापूरला जय्यत तयारी

लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन नेटवर्क )
    
 शेवगाव : अमरापुर, (ता. शेवगाव) येथील श्री रेणुकामाता देवस्थानामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची  धामधुम मोठया उत्साहात सुरू  असून देवस्थानाचा संपूर्ण  परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात येत आहे . श्रीक्षेत्र माहूरगडाहून  पायी ज्योत आणण्यासाठी येथील ३० भाविक येत्या शनिवारी (दि.२८ रोजी)  प्रस्थान ठेवणार आहेत. पाथर्डीचे प्रथम माजी नगराध्यक्ष सुभाष  घोडके व माजी  नगराध्यक्षा जनाबाई घोडके या दांपत्याच्या हस्ते ज्योतीची विधीवत पूजा व श्री रेणुकामातेची आरती करुन पायी ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना  रवाना करण्यात येणार आहे.


           श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे प्रवर्तक, तथा श्री रेणुका भक्तानुरागी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव आपले व्यस्त कामकाज बाजूला सारून संपूर्ण  नवरात्रोत्सवाच्या काळात देवस्थानात मातेच्या चरणी  थांबून असतात. श्री रेणुका परिवारातील पांडुरंग देवकर, श्रीमत घुले, राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाडे, देवस्थानचे पुजारी तुषार देवा , गजानन वाघ, रविंद्र आढाव, सचिन  जाखडे, देव झरेकर, प्रमोद भागवत, सुरेश  गाडे,  गोरख गाडे, अनिकेत म्हस्के, सतीश डोंगरे आदी भाविकांनी   पायी ज्योत आणण्यचे नियोजन  केले आहे.


        श्री रेणुकामाता  देवस्थान  प्रांगणात आकर्षक पेव्हिग ब्लॉक टाकण्यात आले आहेत तसेच विविध प्रकारच्या  हजारो वृक्षराईने परिसर नटला असून   देवस्थानातील सर्व मंदिरांवर आणि तीन मजली भव्य भक्तनिवासावर  तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरु  आहे. यंदा घटी बसणाऱ्या भाविक महिलांच्या व्यवस्थेसाठी  नवे भक्त निवास सज्ज झाले आहे .  

 
        साडेतीन शक्ती पिठापैकी एक पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरच्या श्री रेणुकादेवीचे  अमरापूर येथे ठाणे असून नवसाला पावणाऱ्या आणि भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या श्री रेणुकामातेचे स्थान म्हणून गेल्या १८ वर्षांपासून प्रसिद्धीला आले आहे. त्यामुळे राज्या बाहेरूनही अनेक  भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर, काही विदेशी भक्तही येथे हजेरी लावतात. यंदा पाऊस व पीकपाणी उत्तम असल्याने नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी होण्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या