Ticker

6/Breaking/ticker-posts

महादेवाची भक्ती करताना पतीला परमेश्वर माना ; समाधान महाराज शर्मा




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

          ( प्रशांत गोसावी )
   शेवगाव :  ज्या घरात माणसे हसतात, ते घर जगातील सर्वात श्रीमंत घर होय. त्यामुळे माणसे सांभाळायला शिका. जन्मदात्या आई-वडिलांना अंतर देऊ नका. भावा-भावात तसेच जावा -  जावात विवाद नकोत. महादेवाची भक्ती करताना पतीला परमेश्वर माना. शिवकृपेने आपल्याला काहीच कमी पडणार नाही, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध शिवपुराण कथाकार प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी दिला.


      लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबानगर मैदानात सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. शिव - पार्वती विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्रोत्यांच्या गर्दीने  खंडोबा मैदान अक्षरशः फुलून गेले होते.  कथेदरम्यान श्री. शर्मा यांनी रुद्र संहिता, सती पार्वती खंड यावर सविस्तर निरूपण केल्यानंतर शिव - पार्वती विवाह सोहळा मंगलमय वातावरणात धुमधडाक्यात संपन्न झाला. वऱ्हाडी म्हणून कथा नियोजन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    श्री. शर्मा महाराज पुढे म्हणाले, शिवाच्या डोळ्यातील अश्रू पासून तयार झालेल्या रुद्राक्षाचा महिमा अगाध आहे. एक ते चौदा मुखापर्यंत असलेले रुद्राक्ष नियमांचे पालन करून धारण केल्यास अनेकविध फायदे आहेत.रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी मदिरापान तसेच मांसाहार न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.


     देवाचा आधार नसेल तर तुमची साधना व्यर्थ ठरते. त्यासाठी गुरुकृपा महत्त्वाची आहे. निष्कपट प्रेम करणाऱ्यांना गुरु म्हणून संबोधले जाते. आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर गुरु शिवाय तरणोपाय नाही. मात्र,  गुरुशी बेईमानी केली तर मोठे होता येत नाही. महादेवाची भक्ती विशद करताना श्री. शर्मा महाराज म्हणाले, महादेवाला ' जलाधार '  प्रिय आहे. त्याची मनोभावे आराधना करा, त्याच्यावर निष्काम प्रेम करा. संकटाच्या काळात भोलेनाथाचा धावा केल्यास तो भक्तांसाठी पळत येतो. असा शिवमहिमा आहे, असे श्री. शर्मा महाराज म्हणाले.माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, त्यांच्या सुविध्य पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. राजश्रीताई घुले पाटील तसेच निमंत्रित मान्यवर निमंत्रितांच्या हस्ते महाआरती झाली.


आळंदीची ज्ञानेश्वर माऊली माझा ' श्वास  '
    
     आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात ' माऊली ' माझा ' श्वास ' आहे. आळंदी ने मला जगण्याचे बळ दिले. ज्याचे आळंदीवर प्रेम आहे त्याला जीवनात कशाचीही कमी पडत नाही. कथा, कीर्तनकारांची आळंदी प्रेरणास्त्रोत आहे. हक्काने सुखदुःख सांगायचे जवळचे ठिकाण म्हणजे आळंदी आहे.
 - श्री. समाधान महाराज शर्मा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या