लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर आणि शेवगाव तालुक्यासह वरुर पंचक्रोशीतव संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.शासनाने पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, हवामान ढगाळ असून आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
अमरापूर, फलकेवाडी, भगूर, वरुर, सालवडगाव, खरडगाव, धावनवाडी, आखेगाव, थाटे, वाडगाव, हसनापूर, मंगरूळ आदी गावच्या परिसरात गेल्या दोन दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत आहे.परिणामी, ओढे,नाले प्रवाहित झाले आहेत. पाथर्डी तालुक्यात डोंगर माथ्यावर पाऊस झाल्याने नाणी व चांदणी नदी दुथडी भरून वाहत आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांच्या अंतर्गत मशागतीची कामे खोळंबली आहेत.त्यातच मजुरांची वानवा असल्याने ही कामे लांबणीवर पडली आहेत.बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला वरुर पंचक्रोशीतील गावांना पावसाने चांगलेच झोडपल्याने या भागातील बहुतांशी उभी पिके पाण्यात असून ती सडू लागली आहेत.त्यामुळे बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे.शासनाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बैलपोळ्याला सर्जा, राजाची पूजा करून पुरणपोळी खाऊ घालण्याबरोबरच काळ्या आईला नारळ वाढवून नैवेद्य दाखविण्याची रूढी,परंपरा आहे. मात्र, यंदा पावसाने चांगलाच दणका दिल्याने बळीराजाला चिखल तुडवत काळ्या आईबरोबरच देवदैवतांचे दर्शन घेणे भाग पडले.
0 टिप्पण्या