Ticker

6/Breaking/ticker-posts

ॐ नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र साधकांसाठी तारक



 
 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

( प्रशांत गोसावी ) 
     शेवगाव : ॐ नमः शिवाय या तारक पंचाक्षरी मंत्राचा जप तसेच भस्म लेपन व रुद्राक्ष धारण केल्यावर साधक, उपासकांचा उद्धार  होतो तसेच श्रद्धा व निष्ठेने उपासना करणाऱ्या  साधक, भक्तांवर निश्चित शिवाची कृपा होते. मात्र, त्यासाठी शिवलिंगाची षोडशोपचार पूजा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवमहापुराण कथा प्रवक्ते श्री. समाधान महाराज शर्मा यांनी केले.
     लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबा मैदानावर आयोजित शिवपुराण महाकथेचे दुसरे पुष्प गुंफताना श्री. शर्मा महाराज बोलत होते. कथेसाठी भाविक भक्तांची उच्चांकी गर्दी होती.कथा नियोजन समितीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविक भक्तिरसात चिंब झाल्याचे पहावयास मिळाले.

      शिवाला प्रसन्न करण्यासाठी होम हवन, दानधर्म व तपादी विधी करण्याचे शास्त्राने सांगितल्याचे सांगून श्री. शर्मा महाराज म्हणाले, एकाच देवावर निष्ठा असावी. वारंवार देव बदलू नये. मनात श्रद्धाभाव असेल तर, शंकराचे  ठायी ठायी अस्तित्व जाणवते. बिल्व वृक्षाचे महत्व विशद करताना त्यांनी या वृक्षाच्या मुळाशी सर्वतीर्थ असल्याचे स्पष्ट केले. गुरु महिमा सांगताना श्री. शर्मा महाराज म्हणाले, गुरुमुळे जीवनाचे सार्थक होत असते. क्षेत्र कोणतेही असो, मनुष्याला गुरु हा असलाच पाहिजे. आयुष्याची शिदोरी शिष्यासाठी जो हवाली करतो तो खरा गुरु होय.

       भस्माची महती सांगताना ते म्हणाले, मस्तकावर त्रिपुंड लावल्यावर साधकाला निश्चित मोक्षप्राप्ती मिळते तसेच विभूती धारण करणाऱ्याच्या मस्तकावर २७ देवतांचा वास असतो. रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी नियमादी विधीसह सांगितले. शिवमहापुराण कथेची पुष्टी करताना ते म्हणाले, कथा सांगताना तेथे शांती असते. परिणामतः तेथे भगवंताचा वास असतो. त्यामुळे महाशिवपुराण कथा मनुष्याच्या जीवनाची व्यथा दूर करते. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, सौ. राजश्रीताई घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले पाटील तसेच मान्यवर सन्माननीय निमंत्रित अतिथींच्या हस्ते महाआरती झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या