Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवपुराण कथा ऐकणे म्हणजेच कैलासाचे रिझर्वेशन करणे होय



 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

    ( प्रशांत गोसावी )

     शेवगाव : शिवमहिमा अगाध आहे. शिवपुराण ऐकणे म्हणजेच जिवंतपणी कैलासाचे रिझर्वेशन केल्यासारखे आहे तसेच कलियुगात घोर कष्टापासून मुक्तता शिवपुराणच करू शकते, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवपुराण कथाकार श्री. समाधान महाराज शर्मा यांनी केले. 


     लोकनेते ( स्व.) मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर भव्य शामियान्यात शिवपुराण कथेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. पहिल्याच दिवशी कथा श्रवण करण्यासाठी महिला पुरुषांची तोबा गर्दी झाली होती. प्रारंभी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जि. प. च्या माजी अध्यक्ष सौ. राजश्रीताई घुले पाटील, प .स .चे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, सौ तेजस्विनी घुले पाटील यांच्या हस्ते संत पूजन तर, श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज श्री. प्रवीण महाराज गोसावी, राम महाराज झिंजुर्के, राम महाराज उदागे, उद्धव महाराज सबलस, ज्ञानेश्वर महाराज बटुळे, जगन्नाथ महाराज शास्त्री आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.



     श्री. शर्मा महाराज कथेचे निरूपण करताना पुढे म्हणाले, ज्याचा हेतू चांगला,त्याचा सेतू चांगला. लोकनेते स्वर्गीय घुले पाटलांच्या जयंतीनिमित्ताने घुले परिवाराने भव्य दिव्य शिवपुराण कथेचे पवित्र अंतकरणाने व शुद्ध भावनेने आयोजन केले आहे, त्यामुळे त्यांचे मनोवांछीत पूर्ण होवो,अशी सदभावना त्यांनी व्यक्त केली.


      प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पडावा म्हणून मी कथा करतो. श्रोते ही माझी श्रीमंती, संपत्ती व आनंद आहे. कथेच्या माध्यमातून श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात मला समाधान वाटते. त्यामुळे वाणी धार असणारी नको तर ती आधार देणारी असावी तसेच जीवन हलके असले तरी चालेल पण, ते हलकट नको, असे ते म्हणाले. 


     शिवमहिमा विशद करताना ते म्हणाले, महादेव काळाचे काल आहेत म्हणूनच त्यांना महाकाल म्हटले जाते. शंभूचे ' त्रिशूल '  हे आयुध माणसातील काम, क्रोध व मत्सराचा विनाश करते तसेच कलियुगात घोर कष्टापासून शिवपुराणच मानवाची मुक्तता करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने शिवपुराणकथा श्रवण केली पाहिजे. शिवपुराण कथा ऐकणे म्हणजेच जिवंतपणी कैलासाचे रिझर्वेशन केल्यासारखे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या