लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : सहकारातील अग्रणी लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर बुधवार दि.१८ ते २४ सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध शिव कथाकार श्री. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे, या संधीचा शेवगाव पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिव पुराणकथा नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यानिमित्ताने खंडोबानगर मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. कथेच्या निमित्ताने १८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ पर्यंत कथा निरूपण होणार आहे. सप्ताह काळात दररोज अनुक्रमे शिवपुराण महात्म्य विद्देश्वर संहिता, रुद्र संहिता सती पार्वती खंड शिवपार्वती विवाह, रुद्र संहिता कुमार खंड गणेश कार्तिकेय चरित्र, रुद्र संहिता युद्ध खंड अर्धनारी नटेश्वर नंदी वर्णन, उमा संहिता कैलास संहिता, बारा ज्योतिर्लिंग महात्म्य, शिव मानस पूजाविधी पंचाक्षरमंत्र महिमा आदीबाबत समाधान महाराज शर्मा कथा निरूपण करणार आहेत. मंगळवार दि.२४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता महाप्रसादाने कथा उत्सवाची सांगता होणार आहे.
कथा उत्सव यशस्वीतेसाठी माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.यानिमित्ताने कथा नियोजन समिती पदाधिकारी तसेच शेवगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल महाराज वाळके व संत महंतांच्या उपस्थितीत समर्थ ग्रुप चे अध्यक्ष संजय फडके, सौ.सविता फडके यांच्या हस्ते नुकतेच स्तंभ पूजन मंगलमय वातावरणात पार पडले.
0 टिप्पण्या