डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय व डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्जाची मुदत
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सन २०२३- २४ या वर्षीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ ब क ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येकी एक महसुली विभागातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र,ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.
0 टिप्पण्या