Ticker

6/Breaking/ticker-posts

वंजारी समाज महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी..!



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कृत समाज निर्मिती आणि सामाजिक समता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने वंजारी समाज महासंघाच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  


 निर्मलनगर, संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्स मध्ये हा सोहळा रविवारी (दि.25 ऑगस्ट) रोजी पार पडणार असून, उद्घाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते होणार आहे.

 

या साहित्य संमेलनात राज्यातील लेखक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती वंजारी समाज महासंघाच्या वतीने देण्यात आली. संमेलनासाठी वंजारी महासंघाचे संस्थापक गणेश खाडे, स्वागताध्यक्ष तथा विश्‍वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील, सहस्वागताध्यक्ष अध्यक्ष घनश्‍याम बोडखे, निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर आदी परिश्रम घेत आहेत. 


 सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी वाचणारी व विचार करणारी माणसे निर्माण होण्याची गरज आहे. या साहित्य संमेलनातून सामाजिक विचार मंथन होणार आहे. वैचारिक प्रगल्भ समाज निर्माण व्हावा या उद्देशाने द्वैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. या संमेलनात संस्कृतीचे व विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. या संमेलनात सर्वच समाजातील साहित्य, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिला जाणार असल्याचे गणेश खाडे यांनी सांगितले.


स्वागताध्यक्ष राजकुमार आघाव पाटील म्हणाले की,  महाराष्ट्रातून नामांकित साहित्यिक येणार असून, नगरकरांना हे साहित्य संमेलन एक पर्वणी ठरणार आहे. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. नियोजन अंतिम टप्प्यात असून, रविवारी निर्मलनगर परिसरातून ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. 

सहस्वागत अध्यक्ष घनश्‍याम बोडखे म्हणाले की, संमेलनाचे आयोजक वंजारी समाज महासंघ असून, सर्व जाती-धर्माच्या समाजाला या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. संमेलनासाठी आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या संमेलनातून व सामाजिक सलोख्याची भूमिका त्यांनी मांडली. जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर यांनी शहराला मिळालेले द्वैवार्षिक अधिवेशनाचे यजमानपद सर्व नगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे नाविन्यपूर्ण संमेलन यशस्वी होणार असून, सर्व शाखेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.


 राजकारण विरहित संमेलन शहरात रंगणार असून, यामध्ये सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना निमंत्रित असणार आहेत. साहित्य, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या राज्यातील व्यक्तींना राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्यरत्न पुरस्कार व राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले जाणार आहेत.


 संमेलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार शिवाजीराव गर्जे, केदारेश्‍वर साखर कारखानाचे चेअरमन अॅड प्रतापराव  ढाकणे, उद्योगपती बुधाजीराव पानसरे विविध सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी संध्याकाळी होणार आहे. तरी सर्व नगरकर साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या