Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा पाणीसंघर्ष टळला..!

 जायकवाडीचा जलसाठा पोहोचला ७० टक्क्यांवर


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

   

.नगर ः दि. २९ ऑगस्ट- यंदा पावसाने प्रारंभीपासूनच धुवॉंधार बॅटिंग केल्यामुळे नगरसह नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे या धरणांमधून गोदावरी, मुळा, प्रवरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेतविशेषतः गेल्या आठडयापासून सुमारे १ लाख क्युसेक पाण्याचा ओघ जायकवाडीकडे झेपावत आहे. परिणामी जायकवाडीचा जलसाठा  ७० टक्क्यांवर पोहचला आहेत्यामुळे नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा असा पाणीसंघर्ष यंदा टळला आहे. 


नगर-नाशिकची धरणं भरली तरी जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा झाला नाही तर समन्यायीचं भूत मानगुटीवर बसलेलं असतं. या तत्त्वानुसार  धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येते. त्यामुळे नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा असा पाणीसंघर्ष पेटतो, मात्र यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे वरची धरणं भरली असून उर्वरित पाणी जायकवाडीत पोहचत असल्यामुळे हा संघर्ष यंदा तरी टळला आहे.


      नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तब्बल ५५ टीएमसीहून अधिक पाणी पोहचल्याने 102 टी एम क्षमतेच्या जायकवाडीचा साठा 70 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे यंदा मराठवाडयासाठी पाणी सोडण्याची गरज राहिली नाही. समन्यायीच्या तत्वानुसार जायकवाडीत किमान ६५ टक्के पाणीसाठा असल्यास नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज पडत नाही. यंदा हा आकडा आत्ताच गाठल्यामुळे पाणी सोडण्याची गरज राहिली नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी हा संघर्ष टळला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नेते मंडळी आणि लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


        नाशिकच्या धरणांतून आतापर्यत ३४ टीएमसी तर नगरच्या धरणांतून सुमारे २२ टीएमसी पाणी जायकवाडीला पोहचले आहे. त्यामुळे हा साठा वेगाने वाढून 70 टक्क्यांवर आजच पोहचला. जायकवाडीच्या बॅक वॉटरने शेवगाव तालुक्यातील उत्तर भागात फुगवटा वाढू लागला आहे. आणखी एक-दीड महिना मोठया पावसाचा शिल्लक असल्यामुळे जायकवाडी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा मराठवाडयाचीही पाण्याची चिंता मिटणार आहे. जायकवाडीवर अवलंबून असलेले लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या