लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जगन्नाथ गोसावी
शेवगाव : आम्ही सन २०१४ पासून लाडकी बहीण म्हणून तुमचा सांभाळ केला. मात्र, तुम्ही आमची (कार्यकर्ते व जनतेची) अवहेलनाच केली. मतदार संघ आता बदल मागतोय. त्यामुळे यंदा तुम्ही थांबून या भावाला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे, असा खोचक सल्ला भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांच्या विराट निर्धार मेळाव्यात श्री.मुंढे बोलत होते.अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य होते.
श्री. मुंढे पुढे म्हणाले, सन २०१४ च्या आधी तुम्ही सर्व पक्ष पालथे घातले असताना भाजपाने तुम्हाला आमदार केले.मात्र, तुम्ही गल्लीत लायकी नसलेल्यांना मोठे केले तसेच दलाल पोसण्याचे काम केले.निष्ठावंतांना डावलून बगलबच्चांना मोठे केले.महिला आमदार असूनही आपले राजकारण कपटी असल्याचे श्री.मुंढे यांनी अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.तुम्ही देत असलेल्या वागणुकीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे.तुम्ही नात्यागोत्याचे राजकारण करून मतदारसंघ बुडवायला निघाल्या आहात, अशी जहरी टीकाही श्री. मुंढे यांनी केली.
मी . विचाराचा व शिस्तीचा कार्यकर्ता असल्याने लोकप्रतिनिधीवरील टीका वरिष्ठांनी तपासली पाहिजे, असे सांगून श्री. मुंढे पुढे म्हणाले, माझी राज्याच्या नेतृत्वापर्यंत लाईन आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारी बाबत निशिंत राहावे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आदी आमचे नेते असून त्यांचा आपल्याला पाठिंबा व आशीर्वाद आहे.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, आम्ही २५ वर्षापासून भाजपात जनतेची कामे प्रामाणिकपणे केली, त्यामुळे आम्हाला विधानसभेचे तिकीट मागायचा अधिकार नाही का ? २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला एकजुटीची वज्रमुठ दाखवायची आहे.पक्षाने उमेदवारी नाकारली तरी आमच्या दोघांपैकी (मी किंवा अरुण मुंढे ) एकाची अपक्ष म्हणून उमेदवारी निश्चित आहे.आ.मोनिका राजळे यांचेवर टीका करताना ते म्हणाले, सर्व सत्तास्थाने त्यांच्याच घरात पाहिजेत.
अध्यक्षपदावरून बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य म्हणाले, आमदार म्हणून मोनिका राजळे यांचा पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय प्रशासनावर अंकुश नाही. दोन्ही ठिकाणी चिरीमिरी दिल्याशिवाय जनतेची कामे होत नाही.त्यामुळे असे लोकप्रतिनिधी काय कामाचे ? असा उद्विग्न सवाल करून ते म्हणाले, आपल्या हक्काचा व जनतेचा आवाज ऐकणारा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे. त्यामुळे यंदा भाजपा नेतृत्वाला या मतदारसंघाचे तिकीट बदलावेच लागेल.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे, शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाडे, अमोल सागडे, तुषार पुरनाळे, राहुल बंब, अजय भारस्कर, अंकुश कुसळकर दिगंबर काथवटे, शितल केदार, भूषण देशमुख, सालारभाई शेख, अण्णाभाऊ ढोले, बाळासाहेब डोंगरे, अर्जुन ढाकणे, डेविड गंगावणे आदी उपस्थित होते.
यावेळी मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, विलास फाटके, रमेश कांबळे, संजय टाकळकर, राम पोटफोडे, आरपीआयचे सतीश मगर, बाळासाहेब पाखरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर बाळासाहेब सोनवणे आदींची समयोचित भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कोळगे यांनी केले. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन तर, गणेश कराड यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या