Ticker

6/Breaking/ticker-posts

वरुरला दहीहंडी,पालखी सोहळ्याने आषाढी उत्सवाची सांगता


लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


     शेवगाव : वारकऱ्यांची लाडकी ' धाकटी पंढरी 'अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वरुर,(ता.शेवगाव) येथे आषाढी पोर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.सकाळी स्वयंभू वालुकामय श्रीविठ्ठल -  रुक्मिणी मूर्तीला मंत्रघोषात अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.आषाढी उत्सवाच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरली होती.घरा घरात पै पाहुण्यांची वर्दळ होती.

       दुपारी देवस्थानचे अध्यक्ष भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे काल्याचे किर्तन झाले.सायंकाळी दहीहंडी फोडण्यात आली.महिला भगिनींनी लाह्यांची उधळण केली.त्यानंतर मुकुंद महाराज अंचवले यांचे उपस्थितीत डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडला.मिरवणुकीत ज्येष्ठ टाळकऱ्यांबरोबरच यादवबाबा भक्तीपिठातील युवा टाळकऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता.बँड पथक तसेच टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मारुती मंदिरसमोर आल्यानंतर प्रथेप्रमाणे काला वाटपाचा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. ' गोविंदा.. गोविंदा... ' च्या गजराने परिसर दणाणून गेला.

       पालखी त्रिवेणी संगमावरून परतल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.रात्री जोग महाराज सेवा संस्थांनचे महंत राम महाराज झिंजुर्के यांच्या नेतृत्वाखाली लयबद्ध पावल्या खेळल्या गेल्या.त्यानंतर भारुडाचा बहारदार कार्यक्रम झाला.रात्रभर भजन,हरिजागर झाला.पहाटे पालखी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली.पालखी सोहळा व अन्य कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी वरुर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यंदा वार्षिक आषाढी एकादशी उत्सव समितीच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते,त्यामुळे श्रीविठ्ठल भक्तांचे दर्शन अधिक सुलभ व सुकर झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या