Ticker

6/Breaking/ticker-posts

'धाकटी पंढरी ' वरुरला विठ्ठल भक्तांची मांदियाळी..!




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


     शेवगाव : दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने ' धाकटी पंढरी ' असा सर्वदूर लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र वरुर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुमारे दीड लाख भाविकांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकवत मनोभावे दर्शन घेतले.विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा होत्या.वरुरला येणारे सर्व रस्ते भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.विठ्ठल भक्तांच्या मांदियाळीने आजवरचे सगळे उच्चांक मोडले गेले.


      श्रीक्षेत्र वरुर येथे श्रीविठ्ठल -  रुक्मिणीचे साडेचारशे वर्षांपूर्वीचे भव्य पुरातन मंदिर असून, मंदिरातील वालुकामय मूर्ती स्वयंभू असल्याने वारकरी संप्रदायामध्ये या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.ज्या भाविकांना आषाढीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही,अशा भाविकांचे पाय आपोआप ' धाकट्या पंढरी ' कडे वळतात.आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्त अक्षरशः भक्तीरसात चिंब झाल्याचे पहावयास मिळाले.



      ग्रामस्थांनी श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीने आणलेल्या गंगोदकाचे त्रिवेणी संगमावर विधिवत पूजन झाले.टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात कावडी मंदिरात आल्या.श्रीविठ्ठल -  रुक्मिणीला जलाभिषेक घालण्यात आला.मंत्रघोषात विधिवत मूर्ती पूजन,भजन व महाआरती झाली.सायंकाळी नगर प्रदक्षिणा तसेच जोग महाराज सेवा संस्थांनचे महंत गुरुवर्य राम महाराज झिंजुर्के यांच्या अधिपत्याखालील यादवबाबा भक्तीपिठाच्या वतीने भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला. रात्री देवस्थानचे अध्यक्ष भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.वर्षभर द्वादशीला अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा बादशाह शेख यांच्यातर्फे श्रीफळ,पेढे प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

    


   छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा खा.संदिपान भुमरे,खा.निलेश लंके,आ. मोनिका राजळे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव अँड.प्रताप ढाकणे,महिला प्रदेश सचिव विद्या गाडेकर,माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे,जि.प.च्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे,कार्याध्यक्ष माधव काटे,पं.स.चे माजी सभापती डॉ.क्षितिज घुले,जनशक्ती विकास आघाडीचे ऍड. शिवाजी काकडे व सौ.हर्षदा काकडे,प्रांताधिकारी प्रसाद मते,तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतले.उत्सव समितीच्या वतीने सरपंच सचिन म्हस्के,उपसरपंच आबासाहेब बेडके तसेच अन्य सदस्य व सेवाभावी कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते.विविध सेवाभावी संस्थाच्या वतीने जागोजागी भाविकांसाठी मोफत फराळाचे स्टॉल लावण्यात आले होते.


बा,विठ्ठला.. शेतकरी,जनतेचे भले होऊ दे..

      राज्यातील शेतकरी व जनतेचे भले होऊ दे.सर्वांच्या जीवनात सुख व आनंद मिळू दे तसेच सर्वत्र समाधानक पाऊस होऊ दे,असे साकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा खा.संदिपान भुमरे यांनी श्रीविठ्ठल- रुक्मिणीला घातले.


'धाकट्या पंढरी' ला निधी कमी पडू देणार नाही 

   ' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरुरचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून गावच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही खा.निलेश लंके यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या