लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : सन २०२३- २०२४ या वर्षात खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेवगाव तालुक्यातील ४६ हजार ९७८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा भरला.त्यासाठी ९० हजार ५३४ अर्ज आले.राज्य सरकारने या विम्यापोटी २५ कोटी ५० लाख ३४८ रुपये तर,केंद्र सरकारने १३ कोटी ८३ लाख ६६२ रुपये विमा रक्कम ओरिएंट इन्शुरन्स कंपनीकडे भरली.शेवगाव तालुक्यातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला ३९ कोटी रुपये देण्यात आले.मात्र,कंपनीने प्रत्यक्षात ठराविक शेतकऱ्यांना ४ कोटी ६१ लाख ५४९ रुपयांचा विमा परतावा दिला.उर्वरित शेतकऱ्यांची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने फसवणूक केली आहे.पीक विम्याची ही रक्कम कोणत्याही अटी व शर्तीविना सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी,अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करु,असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.याबाबत आपण कृषिमंत्री,पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले.
श्री.घुले यांची सध्या शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन जनसंवाद यात्रा सुरू आहे.सुमारे ४० गावातील यात्रेदरम्यान श्री.घुले यांनी शेतकरी,ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला,त्यावेळी पिक विमा,पिण्याचे पाणी,रस्ते,वीज आदी ज्वलंत व जिव्हाळ्याचे प्रश्न समोर आल्याचे श्री.घुले यांनी सांगितले.विशेषतः पिक विमा संदर्भात शेतकरी वर्गात असंतोष असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.जेष्ठ नेते काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा नेते ताहेर पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत श्री.घुले म्हणाले,गेल्या दहा वर्षात मतदार संघात कोणतेही भरीव विकासात्मक काम झाले नाही. शेवगावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच बाह्य वळण रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे.शहराला आजही पंधरा - पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही.वाहतुकीची वारंवार कोंडी होते.शेवगाव तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.उगवण झालेल्या कपाशी,तूर,उडीद पिकांची पावसाअभावी वाईट अवस्था आहे.पूर्व भागातील बाडगव्हाण,हसनापूर,मुरमी, शेकटे या परिसरासातील पाण्याचे टँकर प्रशासनाने ३० जूनला बंद केले.परिणामी,नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.या सर्व प्रश्नासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे.त्यामुळे आपण कृषिमंत्री,पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असून प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत,असे श्री.घुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या