लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : विधानसभेची आगामी निवडणूक पुढच्या पिढीच्या भवितव्याची नांदी ठरणार आहे,त्यामुळे आपला हक्काचा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा.संधीचे सोने करू. गोरगरिबांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शेवगाव शहराला दिवसातून दोनदा पिण्याचे पाणी देण्याची ग्वाही देतो,असे प्रतिपादन माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
श्री.घुले यांच्या वाढदिवसानिमित्त शानदार अभिष्टचिंतन सोहळा शेवगावमध्ये तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील होते.यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग,ज्ञानेश्वरचे माजी व्हाईस चेअरमन देसाई देशमुख,दिलीपराव लांडे,काकासाहेब नरवडे,अरुण पाटील लांडे,संजय फडके,पंडितराव भोसले,बाळासाहेब ताठे,राजेंद्र दौंड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.घुले यांनी घनाघाती भाषणातून आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यपद्धतीबाबत चौफेर टीका केली.या आधीच्या लोकप्रतिनिधींनी केलेली विकास कामे उद्ध्वस्त करण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केले, असे सांगून ते पुढे म्हणाले, आपल्याला मंत्रीपदासाठी नाही तर,शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपला हक्काचा माणूस माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या रूपाने लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवायचा आहे.ते संधीचे सोने करतील,असा विश्वास आहे.त्यामुळे ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे.या भावनेने कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे.रस्ते,पाणी,वीज या समस्यांना आपल्याला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. अनेकविध पदावर संधी दिल्याबद्दल श्री.घुले यांनी शरद पवार,अजित पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ.घुले यांना अभिष्टचिंतनपर आशीर्वचन देताना महंत आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले,नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील ही राम लक्ष्मणाची जोडी आहे.ते एकमेकांचे शब्द ओलांडत नाही.त्यांचा सत्कार करण्याचे सौभाग्य मला मिळाले. ही पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे.प्रास्ताविक संजय कोळगे यांनी तर,आभार प्रदर्शन ताहेर पटेल यांनी केले.दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले.
0 टिप्पण्या