लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
भगवानगड : श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९० व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगांव ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची तयारी अंतीम टप्प्यात आली असुन मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९० वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेऊन बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळा ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित असतात. नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत असतात .
२१ एप्रील रोजी हा महोत्सव प्रारंभ होत असुन सप्ताहामध्ये ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताहामध्ये अनुक्रमे ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, ह.भ.प.केशव महाराज ऊखळीकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ,ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवा होणार आहे
सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर जय भगवान ग्रुप, घोगस पारगांव यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रमही होतील
*विशेष आकर्षण : शास्त्री बाबांचे ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण*
सप्ताहातील सर्वांत मुख्य आकर्षण म्हणजे ज्ञानेश्वरी भावकथेच्या रूपाने ज्यांनी देशभरातील भाविकांना ज्ञानेश्वरीतील ज्ञान सांगून वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केले आहे असे श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचा सप्ताहामध्ये दररोज ठीक ३ ते ५ या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळा संपन्न होणार आहे.
*महंत नामदेव महाराज शास्त्रीजींचा अभिनव उपक्रम*
यंदा उष्णता जास्त असल्यामुळे भाविकांना कीर्तन ऐकताना उकाड्यापासून मुक्तता मिळावी म्हणून सप्ताहातील सर्व कीर्तनं मोकळ्या पटांगणात होणार आहेत. तर दिवसभरातील कार्यक्रमासाठी भव्य मंडपाची उभारणी केलेली आहे.
*जय भगवान ग्रुपची महापंगत*
आतापर्यंतच्या सर्व नारळी सप्ताहांमध्ये काल्याच्या पंक्तीचा महाप्रसाद हा संबंधित ग्रामस्थांनी तयार केला होता. परंतु यावर्षी मात्र घोगस पारगांवमधील ३८ तरुणांनी जय भगवान ग्रुपच्या माध्यमातून विशेष पुढाकार घेत नारळी सप्ताहाची काल्याची महापंगत देण्याचा निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे.
*महिलांकडून पहिल्याच दिवशी २० क्विंटलचे मोतीचूर लाडू*
यावर्षी नारळी सप्ताहामध्ये घोगस पारगांवमधील महिलांतर्फे उपस्थित लाखो भाविकांना सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २० क्विंटल मोतीचूर लाडूंचा प्रसाद देण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील संपूर्ण महिलांनी मागील चार दिवसांपासून हा प्रसाद बनवला आहे.
0 टिप्पण्या