लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : शेवगावमध्ये एका माथेफिरूने रविवारी (दि.३१रोजी) मुलींची छेड काढल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या ' शेवगाव बंद ' ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सरकारी,निमसरकारी आस्थापना,एसटी वाहतूक तसेच अत्यावश्यक सेवा वगळता येथील व्यापारी,व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून ' बंद 'ला पाठिंबा दर्शविला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्यात आला.मुख्य बाजारपेठ,डॉ.आंबेडकर चौक, एसटी स्टँड चौकातून मोर्चा पोलीस स्टेशनवर नेण्यात आला.येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) साईनाथ आधाट तसेच सकल हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाडे,शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीरज लांडे,भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कवडे आदींची भाषणे झाली.सर्व वक्त्यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून टीका केली.संबंधित माथेफिरूवर पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान,पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनोरुग्ण माथेफिरुस न्यायालयासमोर उभे केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
0 टिप्पण्या