लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे.त्यांना संधी व योग्य मार्गदर्शन मिळाले तर,ते यशाला गवसणी घालतात,असे प्रतिपादन वरुर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे यांनी केले.
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या वरुर,(ता. शेवगाव)येथील पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील वैष्णवी संतोष सोनटक्के,प्राज्ञिक राजीव गोरडे,श्रावणी राम शिंदे,प्रीती शरद धायतडक व श्रावणी आप्पासाहेब कसाळ या पाच विद्यार्थ्यांनी एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक)परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याने त्यांचा तसेच पालकांचा गुणगौरव सोहळा श्री.वावरे यांच्या हस्ते पार पडला,त्यावेळी ते बोलत होते. मुख्याध्यापक सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते.
श्री.वावरे पुढे म्हणाले की,आज सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. ज्यांच्या अंगी कर्तुत्व आहे अशी माणसे जीवनात यशस्वी होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे.त्यांना संधी व योग्य मार्गदर्शन मिळाले तर,ते निश्चितपणे भरारी घेतील. लोकनेते (स्व.)मारुतराव घुले पाटील यांनी वरुरमध्ये पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचा आम्हास अभिमान असल्याचे सांगून त्यांनी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक शरद भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच भागवत लव्हाट,प्रगतशील शेतकरी अशोक खांबट उपस्थित होते. कार्यक्रमास साहेबराव रेवडकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खडके तसेच शिक्षक,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालिंदर शेळके यांनी सूत्रसंचालन केले.राजू जमधडे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या