लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
( जगन्नाथ गोसावी)
शेवगाव : तालुक्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.पोलिसांचा वचक नसल्याने चोऱ्या, घरफोड्या,जबरी चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.मात्र, स्टेशन डायरीला गुन्हे नोंदविले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शेवगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे बोकाळले आहेत.या धंद्यातून पोलीस ' वसुली ' नेमकी कोणासाठी करतात ? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. वाढती गुन्हेगारी हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
पोलीस निरीक्षक विलास पुजारींच्या तडकाफडकी बदलीनंतर येथे नव्याने निरीक्षक रुजू झाले.या नव्या दमाच्या अधिकाऱ्याकडून शेवगाव तालुक्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र,त्या सपशेल फोल ठरल्या आहेत.नवे अधिकारी स्वागताचे हारतुरे स्वीकारण्यात गुंतले आहेत.रात्रीची गस्त नावापूरती उरली आहे. गस्तीच्या नावाखाली रात्रभर दुसरेच उद्योग अधिक चालतात.पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एसटी स्टँड आहे.तेथे पंधरा दिवसात दोनदा महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. नित्यसेवा चौकात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा तपास एलसीबी चे पथक लावते.मग,शेवगाव पोलीस करतात तरी काय ? हा खरा सवाल आहे.
शेवगाव पोलिसांमध्ये अंतर्गत प्रचंड गटबाजी,धूसपूस आहे. ' वसुली ' हे त्याचे मुख्य कारण असल्याचे बोलले जाते. कलेक्शनच्या नावाखाली कित्येक कर्मचारी ड्युट्या करत नाहीत. ज्यांचा वशिला नाही,असे कर्मचारी गार्ड ड्युटी,इन्साफ ड्युटी तसेच बंदोबस्त कामी पाठवले जातात.शहर वाहतुकीचाही बोजवारा उडालेला आहे.ट्रॅफिक पोलीस नेमणूक दिलेल्या चौकात कधीच थांबत नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते. बऱ्याचदा ' झिरो ' पोलीस वाहतुकीचे नियंत्रण करतात.
शेवगाव शहरासह तालुक्यात मटका,जुगाराचे क्लब,अवैध दारू विक्री,अवैध वाळूची चोरटी वाहतूक तसेच मावा,गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. चोऱ्या,घरफोड्या,जबरी चोऱ्या वाढलेल्या असताना पोलिसांचा कुठेही वचक नाही.पोलीस निरीक्षकांच्या दिमातीला एपीआय,पीएसआय व पोलीस अंमलदारांचा मोठा काफीला असताना गुन्हेगार मोकाट कसे ? हा खरा जनतेचा सवाल आहे.
शेवगावला डीवायएसपींचे कार्यालय आहे.मात्र,त्यांचे पोलीस स्टेशनवर नियंत्रण नाही.या कार्यालयातही खास मर्जीतील कर्मचारी वसुलीसाठी तैनात असल्याची चर्चा आहे.कर्तव्यदक्ष समजले जाणारे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी शेवगाव तालुक्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या