मुंबई: राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर हे 20 डिसेंबर पासून अर्जित रजेवर गेले असल्यामुळे ग्रंथालय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अहमदनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसे आदेश राज्याचे उपसचिव प्रताप लुबाळ यांनी नुकतेच दिले आहेत.
दरम्यान श्री. गाडेकर यांनी आज (दि. 22) रोजी तत्काळ मुंबई येथे ग्रंथालय संचालनालयात हजर होऊन संचालक पदाची सूत्र हाती घेतली.
श्री गाडेकर हे सध्या अहमदनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी असून हे कामकाज पूर्ववत पाहून त्यांनी राज्याच्या ग्रंथालय संचालकपदाची सूत्रे तत्काळ हाती घेऊन पुढील आदेश येईपर्यंत कार्यभार सांभाळावा, असे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.
श्री गाडेकर हे गेली 25 वर्षांपासून ग्रंथालय विभागातील विविध पदावर काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, जालना व सध्या अहमदनगर आदी विविध ठिकाणी विविध पदांवर अत्यंत जबाबदारीने काम करतांना अभ्यासपूर्ण पद्धतीने ग्रंथालय चळवळीला वेगळी दिशा दिली आहे.
श्री. गाडेकर यांनी यापूर्वी नाशिक येथे सहाय्यक ग्रंथालय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आठ महिने सांभाळला आहे. तसेच नाशिक व रत्नागिरी येथे कार्यरत असताना विविध अतिरिक्त पदांची जबाबदारी सांभाळली आहे. सन 2013 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक म्हणून त्यांनी अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आता त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. प्रदीर्घ अनुभव आणि राज्यभरातील ग्रंथालय चळवळीचि खडा- न- खडा माहिती असलेले ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा विचार करूनच शासनाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपिल्याचे स्पष्ट होते. गाडेकर यांना नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार 1992 मिळालेला आहे. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालयाचा 1995 मध्ये जिल्हा युवा पुरस्कार मिळाला.
श्री गाडेकर यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी काम करत असताना ग्रंथालय सेवेत मूलभूत बदल घडवून क्रांतिकारी सुधारणा केल्या आहेत. वाचनालयाचे व्यवस्थापन,संगणकाचा वापर, प्रशिक्षण, नवीन ग्रंथालयाची स्थापना, वाचनालयांचा महिला, बाल विभाग विस्तार आणि विकास तसेच वाचन चळवळीचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
अहमदनगर येथे गेल्या चार वर्षापासून भव्य दिव्य ग्रंथ प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासाठी जिल्हाधिकारी व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि आ. संग्राम जगताप व अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे आदी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रंथालयासाठी सातत्याने पाठपुरावा करून शासकीय जागा मिळवून दिली आहे. लवकरच या जागेवर अध्ययावत व सुसज्ज असे ग्रंथालय उभारले जाणार आहे.
साहित्यिकांशी थेट संबंध विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी योग्य समन्वय साधून विविध ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दांडगा जनसंपर्क, कर्मचारी, सहकारी आणि ग्रंथालय कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्शन या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते वाचनालय चळवळीतील आदर्श अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्यावर आता राज्याची जबाबदारी दिली गेल्याने त्यांच्या आजपर्यंतच्या उज्वल कामगिरीचा हा एकप्रकारे गौरव झाला आहे. अशा शब्दांत त्यांच्या या निवडीचे राज्यभरातील ग्रंथालय कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्य ग्रंथालय संचालनालयात संचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारताना अशोक गाडेकर, समवेत यावेळी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मण सोनाळे , संतोष वाडेकर आदी.
0 टिप्पण्या