लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर दि. 16 डिसेंबर :- यंदा कमी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणी जायकवाडीला न सोडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव तत्काळ शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यातील जलप्रकल्पामध्ये उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपिकाला मिळावे, यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडण्याच्या सूचना राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील जलप्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. पिण्याला, उद्योगांना पाणी आरक्षित करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या, शेतीपिकालाही वेळेनुसार पाणी मिळेल,यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. जलप्रकल्पातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होणार नाही ,तसेच पाणी शेतपीकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यकतेनुसार चाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी.
पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा होणार नाही यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मुळा कालवा, निळवंडे, भंडारदरा गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचा विस्तृतपणे आढावा घेतला. उपस्थित लोकप्रतिनिधीनींही आवर्तनाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सुचना केल्या.
0 टिप्पण्या