Ticker

6/Breaking/ticker-posts

नागरिकांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीचे १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे अभिलेख कक्षात दाखल करावेत: जिल्हाधिकारी



लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क )  

अहमदनगर दि. 18 नोव्हेंबर :-  शासनाने दिलेल्या पत्रानुसार मा. न्यायमूर्ती  संदीप शिंदे (निवृत्त)  यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा  विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा दि. 2 डिसेंबर, 2023 रोजी  विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे.

 जिल्हयातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकानी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादि जुने अभिलेखे जिल्हा स्तरावरील स्थापित विशेष कक्षात दिनांक 21 नोव्हेंबर  ते  24 नोव्हेंबर,2023 या कालावधीत जमा करता येतील. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील  १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

      शासनाने  मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी मा. न्यायमूर्ती  संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या समितीस मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळ झालेले करार निजामकालीन संस्थानिकांना दिलेली सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तीना मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. शासनाच्या ३ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार  समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आलेली आहे.

   मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात "स्वतंत्र कक्ष" स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२३ पासून विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या