लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी शेवगाव तालुक्यात कोणतेही विकासाचे भरीव काम केले नाही.रस्ते,वीज पाणी,आरोग्य आदी जनतेचे मूलभूत प्रश्न ' जैसे थे 'आहेत तसेच गावागावात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना लोकप्रतिनिधी गप्प आहेत.परिणामी,जनतेला कोणी वालीच उरलेला नाही.आपले प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याची धमक असलेला आपला हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा,असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधून १३ ग्रामपंचायतचे नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार,दिवाळी फराळ वाटप तसेच कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात श्री.घुले प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील,ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, मोहनराव देशमुख,काकासाहेब नरवडे तसेच डॉ.क्षितिजभैया घुले पाटील, अरुण पाटील लांडे,मन्सूरभाई फारुकी,शिवाजीराव भुसारी,पवनकुमार साळवे,संजय फडके आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.घुले पुढे बोलताना म्हणाले की,जायकवाडी धरण उशाला असताना शेवगाव शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो.ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.नगरपरिषदेला स्वतंत्र नव्या कार्यालयाची आवश्यकता असताना ते पैठण रस्त्यावरच्या क्रीडा संकुलात थाटले आहे तसेच शासकीय इमारत नसल्याने प्रांत ऑफिसचा कारभार पाथर्डी जवळच्या माळी बाभुळगाव येथील डाक बंगल्यातून सुरू आहे.ही जनतेची फरपट नाही का ? असा सवाल करून श्री.घुले पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील गावागावात रस्ते, पिण्याचे पाणी,आरोग्य व विजेच्या प्रश्न गंभीर बनलेला असताना लोकप्रतिनिधी राजकीय पोळी भाजण्यात तसेच सत्ता संघर्षात दंग आहेत.त्यांना ग्रामीण जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणे घेणे नाही.या सर्वच प्रश्नांवर घुले यांनी नाव न घेता आमदार राजळे यांच्यावर टीकास्त्र डागले.
कार्यकर्ते घुले बंधू बरोबरच...
शेवगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक १३ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असताना माजी आमदार घुले बंधूंनी आपण शरद पवार की अजित पवार गटाचे ? याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात असले तरी,ते घुले बंधूंच्या सोबत असल्याचे या स्नेह मेळाव्यातून अधोरेखित झाले आहे.
0 टिप्पण्या