पाथर्डी येथे अंत्यदर्शनासाठी चाहते,कार्यकर्त्यांची रीघ
नगर येथे साईदीपमध्ये घेतला अखेरचा श्वास; शनिवारी अंत्यसंस्कार
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा संघर्षमय राजकीय प्रवास करून लक्षवेधी ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बबनराव ढाकणे यांना अखेर काळापुढे हार मानावी लागली. नगर येथील साईदीप रूग्णालयात त्यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
गेले काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे मुलगा ॲड. प्रतापराव, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बबनराव ढाकणे यांचे पार्थिव पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पाथर्डी - शेवगाव,बीड, अहमदनगर,पुणे आदी ठिकाणाहून सहकारी,मित्र आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हे पार्थिव शनिवारी दुपारपर्यंत येथे ठेवले जाईल, त्यानंतर तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान बबनराव ढाकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या असून शोक व्यक्त केला आहे. ढाकणे यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
0 टिप्पण्या