नामदेवराव देसाई यांच्या निधनाने ग्रामीण साहित्याची मोठी हानी
नगर जिल्ह्याचे विनोदी कथाकार, साहित्यीक , विडंबनकार म्हणून नामदेवराव देसाई यांचे नाव ८० च्या दशाका पासून चांगलेच गाजले. जागेवर बसलेल्या माणसाला तासन् तास खुर्चीला खिळवून ठेवण्यात नामदेवराव यांची अस्सल ग्रामीण ढंगाची विनोदी शैली अफलातून होती. त्यांनी गावकरी ,सार्वमत आदी वर्तमान पत्रातून केलेलें विडंबन, विनोदी लेख गावाकडील माणसांच्या मनाचा ठाव घेत होते. त्यांचे 'नामा निराळा' हे सदर खूपच लोकप्रिय झाले. त्यांच्या निधनाने ग्रामीण साहित्याची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली...
त्यांची एक आठवण...
आम्हीं शेवगाव च्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात असताना कासार पिंपळगाव ता.पाथर्डी येथे नुकतेच महाविद्यालय सुरू झालेले होते.या महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांनी काव्य संमेलनाच आयोजन केलं होतं. या संमेलनास शेवगाव वरून भगवान राऊत, शहनाज पठाण, राजेंद्र फंड आणि आम्ही गेलेलो होतो. त्यावेळी श्रीरामपूर येथून आलेले कथाकार नामदेवराव देसाई, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, नेवासा येथुन आलेले प्राचार्य देवदत्त हूसळे, पाथर्डी महाविद्यालयाचे तत्कालीन उपप्राचार्य प्रा. डॉ.शंकरराव चव्हाण, लोणीचे भास्कर दादा लगड, बारागाव नांदूरच्या चंद्रकलाताई आरगडे, डॉ. कैलास दौंड, कवी शेखर इक्बाल शेख, शाहिर भारत गाडेकर यांच्यासह तत्कालीन नवोदित व आजचे नामांकित अनेक परिचित मित्र आले होते. याच काव्य संमेलनात देवदत्त हूसळे आणि नामदेवराव देसाई या जोडगोळीचा परिचय झाला,आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोड्याच दिवसात परिचयाचे रूपांतर मैत्रीत झाले. खरंतर हे दोन्हीही ज्येष्ठ साहित्यिक होते, पण तरीही नवोदित साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम ते सातत्याने करत होते. आपुलकीने साधत असलेला संवाद आमच्यासारख्या नवीन लिहिणाऱ्याना आकर्षित करत असे. पुढे काव्यसंमेलने आणि साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हा संवाद वाढला. त्यावेळी सर्व जण मिळेल त्या वाहनाने अथवा बस ने काव्य संमेलनासाठी उपस्थित राहात .राजुर तालुका अकोले परिसरामध्ये रत्नाताई कांबळे यांनी आयोजित केलेलं काव्यसंमेलन असो की रावसाहेब झावरे यांनी अपंग विद्यालय,टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आयोजित केलेलं काव्यसंमेलन. डॉ.संजय बोरुडे यांनी घोडेगाव येथे आयोजित केलेलं कथाकथन आणि काव्य संमेलन विशेष गाजलं.
विविध संस्था संघटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता राहताच आम्हीही शेवगाव येथे शब्दगंध ची घडी पत्रिका सुरू केली आणि पत्रिकेत नोंदितांच्या कविता प्रकाशित करायला सुरुवात केली. आम्ही ती घडीपत्रिका सर्वांपर्यंत पोहोचवत असू. शब्दगंधच्या त्या घडीपत्रिकेला त्यावेळी उत्तम प्रतिसाद मिळत असे.कार्यक्रमाच्या निमित्ताने या जोडगोळीची भेट होत असे.तेव्हा ते म्हणत, “तू कवींसाठी सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे,पण आमच्या सारख्या कथाकरांचं काय “ आणि शब्दगंध चा तो उपक्रम सातत्याने चालण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना,वेगवेगळ्या आयडिया शेअर करत असत.भगवान राऊत, शर्मिला, डॉ.संतोष साबळे,श्रीनिवास गोरे,गोरख काळे आम्ही सर्वांनी पुढे दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं. मग या दिवाळी अंकात प्राचार्य देवदत्त हूसळे आणि नामदेवराव देसाई यांच्या छोटेखानी कथा असत. नामदेवराव देसाई ग्रामीण विनोदी ढंगाने लिहीत असल्याने आणि नेमकेपणे प्रश्नावर बोट ठेवून लिहीत असल्याने वाचक त्यांच्या कथा आवडीने वाचत असत.तसेच अस्सल ग्रामीण कथा देवदत्त हूसळे यांच्या असल्याने त्यांचाही वाचकवर्ग वेगळा असा होता. या दोघांच्याही लेखनाने शब्दगंध च्या दिवाळी अंकात एक तजेलदारपणा येत असे.
पुढे शिक्षण,व्यवसाय,नोकरीच्या निमित्ताने आम्ही सर्व मित्रमंडळी अहमदनगर ला आल्यानंतर नवोदित लेखक कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रा.सुधीर शर्मा यांच्या पुढाकाराने शब्दगंध साहित्यिक परिषदेची स्थापना केली.या स्थापनेच्या प्रसंगी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास नामदेवराव देसाई उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि संदेश आजही आम्ही मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेला आहे.शब्दगंध च्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या बैठकीलाही ते उपस्थित होते. शब्दगंध च पहिलं साहित्य संमेलन कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं निश्चित झाल्यानंतर काही ज्येष्ठांनी त्यावर प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नामदेवराव देसाई यांनी पुढे येऊन नवोदितासाठी घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असून संमेलन तुम्ही उत्तम प्रकारे घ्या. कथाकथन साठी आम्ही येतो अस सांगितल,जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांनी पहिल्या संमेलनाचं उद्घाटन लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात केल,त्यावेळी आमच्या सोबत जोडलेले राजेंद्र उदागे सध्या शब्दगंध च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. दुसरे संमेलनाचे नियोजन करण्याच्या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आम्ही फिरून काही मान्यवरांची संवाद साधला.आणि त्यातून ज्येष्ठ लेखक नामदेवराव देसाई यांचे नाव या संमेलसाठी पुढे आले. आदर्शगाव हिवरेबाजार या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शना खाली तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी नामदेवराव देसाई,डॉ.रावसाहेब शिंदे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरे बाजार ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. तो अतिशय आनंदाचा क्षण होता.नामदेवराव देसाई यांचे मिस्किल बोलणं सर्व ग्रामस्थांना भारावून टाकणार होतं.पुढे अनेक कार्यक्रमात साठी आम्ही त्यांचा सल्ला घेत.त्यानंतर झालेल्या प्रत्येक संमेलनाला ते आवर्जून उपस्थित राहत असेत. ते ज्या ज्या त्जोकानी होते त्या त्या ठिकाणी त्यांनी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हातील सर्व साहित्यिकांना बोलवल होत. देवदत्त हूसळे यांना संमेलनाध्यक्ष करण्यापूर्वीच ते गेले पण त्यांना शनिशिंगणापूर येथे झालेल्या संमेलनात नामदेवराव देसाई यांच्याच हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.एका साहित्यिक मित्राचा गौरव आपल्या हस्ते होत आहे,याचा त्यांना खूप आनंद झाला होता.देसाई काकांचे कथाकथन अतिशय रंगतदार होत असे.कथाकथनाला प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एक हरहुन्नरी साहित्यिक,कलावंत होते.नामदेवराव देसाई म्हणजे एक आनंदाच झाड होत,ते झाड आता आपल्यातून निघून गेलेल आहे.त्यांच्या असंख्य आठवणी मनात साठवून त्यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-सुनील गोसावी संस्थापक सचिव, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, ९९२१००९७५०
0 टिप्पण्या