लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आष्टी , जि. बीड :- दि. २३ सप्टेंबर २२
आज आष्टी येथे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ऑनलाइन नगर - आष्टी रेल्वेच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. यावेळी नवीन आष्टी-नगर रेल्वे डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
आष्टी येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, खा. डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार सर्वश्री सुरेश धस, राम शिंदे, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.
नवीन आष्टी-नगर ब्रॉडगेज लाईन मराठवाड्याच्या विकासाचा नवा मार्ग ठरेल. नगर आणि बीड जिल्हे जोडले गेले. शेतकरी, स्थानिक व्यापार, उद्योग यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
आष्टी-नगर ही 66 किमी ब्रॉडगेज लाईन नगर-बीड-परळी वैजनाथ या 261 किमी ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. या संपूर्ण प्रकल्पात केंद्र आणि राज्य सरकार यांचा 50-50 टक्के खर्चाचा वाटा आहे.
नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने 2000 कोटी रुपये निधी दिले आणि राज्य सरकारकडून 1400 कोटी रुपये देण्यात आले. हा सर्व निधी आमच्या काळात दिला गेला. केंद्राचा सर्वाधिक निधी पंतप्रधान मोदीजींच्या काळात मिळाला. मविआने मात्र निधी रोखला होता.
लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले सरकार येताच वेग मिळाला, त्वरेने निर्णय घेण्यात आले. गेल्या सरकारने रेल्वे प्रकल्पांना निधी देणे बंद केले होते. आता आमच्या सरकारने पुन्हा निधी देणे सुरू केले. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो! असे प्रतिपादन उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठवाड्यातील बंधू-भगिनींचे नगरपासून परळी वैजनाथपर्यंतच्या रेल्वेचे हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल! हा केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनच्या सरकारचाच निर्धार आहे , असेही त्यांनी सांगीतले.
मराठवाड्याच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम गतीने सुरु आहे. लातूर येथील कोच फॅक्टरीचेही लोकार्पण लवकरच होणार. त्यामुळे देशातील मेट्रो, नव्या गाड्यांचे कोचेस आता मराठवाड्यात तयार होतील. नव्या अर्थकारणाला चालना मिळेल. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत व्यक्त केला.
0 टिप्पण्या