Ticker

6/Breaking/ticker-posts

आरोपी व साक्षीदारांकडून खरं बोलावून घेणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे : जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा

 



 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर – न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासाठी अभियंत्यांचे सहकार्य होत आहे. ई चलन तंत्रज्ञान आल्याने जिल्ह्यातील मोटार व्हेईकलच्या केसेस जवळपास निकाली निघाल्या आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात नगर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. पक्षकरांना न्याय मिळण्यास कोर्टात विलंब होत असतो. झटपट न्याय मिळावा यासाठी जर अभियंत्यांनी आरोपी व साक्षीदारां कडून खरं बोलावून घेणारे तंत्रज्ञान विकसित केले तर दावे वेगाने निकाली लागतील तसेच कोर्टात येणारे दावेही मोठ्यासंख्येने कमी होतील. असे तंत्रज्ञान विकसित व्हावे हे माझे स्वप्न आहे. मलाही इंजिनिअरिंग करायचे होते. मात्र पैशाअभावी ते स्वप्न अर्धवट राहिल्याने न्यायाधीश झालो.  माझ्या मोठ्या मुलाने माझे हे स्वप्न पूर्ण केले आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.


            दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नगर केंद्राच्या वतीने अभियंता दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा बोलत होते. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक व अभियंता मनोज पाटील, प्रमुख व्याख्याते व  श्रायडर इलेक्ट्रिक इंडियाचे संचालक अरविंद पारगावकर,  इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नगर केंद्राचे अध्यक्ष अभियंता मनोहर अणेकर, मानद सचिव अभियंता अॅड. अभय राजे, माजी अध्यक्ष अशोक कुलकर्णी आदी व्यासपीठवर उपस्थित होते. या कार्यक्रमात इंजिनिअरिंग क्षेत्रात बहुमोल योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभियंता प्रकाश गांधी यांना अभियांत्रिकी, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “जीवनगौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


            पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले, इंजिनिअरींगचे शिक्षण घेतल्यावर त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणूनही काम केले. पोलीस अधिकारी झाल्यावर मी जरी इंजिनिअरींग सोडले असले तरी इंजिनिअर ही पदवी सोडलेली नाहीये. आजही या इंजिनिअर असल्याचा फायदा मला होत आहे. ई चलन प्रणालीचे तंत्रज्ञान मी २००९ साली विकसित केले होते. त्यात बदल करून आता २०१८ पासून राज्यात वापरले जात आहे. पोलीस क्षेत्रात अनेक मोठ्या पदांवर इंजिनिअर काम करत आहेत. इंजिनिअर हे निर्माते आहेत. जी निर्मीती व विकास होत आहे त्याचे मूळ इंजीनिअर आहेत. त्यामुळे तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स संस्थेने इंजिनिअर्स डे निमित्त खूप ज्ञान देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


            अरविंद पारगावकर यांनी व्याख्यानात इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञाना बद्दल माहिती दिली, सध्याचे इंजिनिअरिंग हे स्मार्त इंजिनिअरींग आहे. त्यामुळे औद्दोगिक क्षेत्रात मोठी प्रगती केली जात आहे. इंडस्ट्री ४.० ही चौथी औद्दोगिक क्रांती होत आहे. पूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग मुळे त्रस्त झाले आहे. बल वॉर्मिंगचे बेटर वर्ल्ड मध्ये रुपांतर करण्याची क्षमता इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानामध्ये आहे.असे सांगितले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव अभियंता अॅड. अभय राजे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका सांगितली. अध्यक्ष मनोहर अणेकर यांनी नगर-कल्याण रोडवर संस्थेच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून सभासदांनी त्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ.प्रकाश गरुड व डीबीएस बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन केले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दादासाहेब करंजुले ब भारतभूषण भागवत यांनी केले. अभियंता दिना निमित्त “स्मार्ट इंजिनिअरिंग फॉर ए बेटर वर्ल्ड ” या मध्यवर्ती संकल्पनेवर विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी  घेण्यात आलेल्या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंत खर्डे व शासकीय तंत्रनिकेतनचे विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब खरबस यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यात आला. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत नागरे व डॉ. महेश हारणे यांना अभियांत्रिकी उपलब्धी पुरस्कार, अडसूळ अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. हेमंत जाधव, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील सहाय्यक व्यस्थापक अमित केसकर व  शासकीय तंत्रनिकेतन मधील उत्पादन अभियांत्रिकीचे व्याख्याते सचिन बंडगर यांना उदयोन्मुख अभियंता पुरस्कार देण्यात आला. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका देवयानी भामरे यांना महिला अभियंता पुरस्कार देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या