Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांच्या गटातील वादावर पडदा

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सांगली : गणेशोत्सवामध्ये स्वागत कमानीच्या जागेवरून निर्माण झालेला शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांच्या गटातील वाद सामोपचाराने मिटविण्यात प्रशासनाला शनिवारी यश आले. दोन्ही गटांनी मूळ जागा वगळून स्वागत कमान व स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

महाराणा प्रताप चौकामध्ये विसर्जन मिरवणुक मार्गावर स्वागत कमान उभारण्यासाठी ठाकरे व शिंदे गटांने पोलीस ठाण्याकडे सहमती मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलीसांनी स्वागत कमान उभारणीला हरकत घेतली होती. यावरून शिवसेनेतील दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता.

या वादावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी उप अधिक्षक अशोक विरकर, तहसिलदार दगडू कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय शिंदे व ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यासह पोलीस निरीक्षक राजू सावंत्रे, मुकुंद कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अनिल माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव होवाळ आदी उपस्थित होते.

यावेळी उभय गटाचे म्हणणे ऐकून शहरातील शांतता अबाधित राहावी, सलोख्याच्या वातावरणामध्ये उत्सवाचा आनंद सामान्यांना घेता यावा यासाठी तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन करण्यात आले. 

पारंपारिक जागेवर कोणालाही स्वागत कमान उभी करता येणार नाही. मूळ जागेपासून काही अंतराववर स्वागत करण्याची तयारी ठेवावी असेही सूचविण्यात आले.

यानुसार मूळ जागेपासून २५ फूट अंतरावर ठाकरे गटाने स्वागत कमान उभारण्याची तयारी दर्शवली तर, शिंदे गटाने म्हसोबा मंदिराजवळ रस्त्यावर स्वागत कक्ष उभारण्यास सहमती दर्शवली. यामुळे स्वागत कमानीवरून शिवसेनेच्या दोन गटात होऊ पाहणारा संघर्ष सामोपचाराने मिटविण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे गणेशभक्तांनी सुटकेचा नि:स्वास सोडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या