लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शिर्डी, दि.१२ सप्टेंबर - भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार १ ऑगस्ट २०२२ पासून मतदान ओळखपत्र ‘आधार’शी संलग्न करण्याची मोहीम सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३५ लाख ५७ हजार २६६ मतदारांपैकी ११ लाख ७९ हजार ९७२ मतदारांनी त्यांचे मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक केले आहे. दीड महिन्यातच जिल्ह्यातील ३३.१७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मतदानकार्ड ‘आधार’शी संलग्नीकरण करण्याच्या या मोहीमेने वेग घेतला आहे. प्रत्येक मतदारांनी लवकरात लवकर मतदान ओळखपत्र आधार नंबरशी लिंक करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.
दुबार मतदार शोधून काढणे, मतदार याद्या अधिकाधिक त्रुटीरहीत करण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व मतदान कार्डाची आधार जोडणी (Aadhaar link) करण्याची मोहीम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही मोहिम ऐच्छिक असून मतदारांनी फार्म-6 ब भरून दिल्यानंतर त्याची आधार जोडणी केली जाते. मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे दुबार नावे, पत्ता पूर्ण नसणे यासारखे दोष आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे. ३१ मार्च पर्यंत १०० टक्के मतदारांकडून स्वच्छेने आधार क्रमांक गोळा करून मतदान-आधार प्रमाणीकरण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज ६ (ब) ERO Net , Garuda App, www.nvsp.in आणि VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुलभतेसाठी Voter Helpline App ची सुविधा दिलेली आहे. VHA व्दारे मतदारांना आधार क्रमांक लिंकींग करता येतील तसेच मतदारांना www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. मतदारांकडे आधारक्रमांक नसल्यास अर्ज क्रं. ६ ब मध्ये दर्शविलेल्या ११ पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे.
मतदारांनी स्वत: मतदान कार्ड आधारशी जोडणी करण्याचा प्रयत्न करावा किंवा आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) शी संपर्क साधून आधार जोडणी करावी. असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखतर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या