लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांकडून केला जातो. हा दावा खोडून काढत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
'शिंदे गटाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण चूक केली आहे, आपण फसलो आहे, हे लक्षात आल्यामुळे बंडखोर गटाकडून असे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, हे कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे,' असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. 'आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसैनिक कोणत्याही दबावाला आणि मोहाला बळी पडणार नाही. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र पराभूत झालो असतो तरी मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ही दोन्ही नावे एकाच नाण्याच्या बाजू,' असं राऊत म्हणाले.
0 टिप्पण्या