नागरिक भयभीत; वन विभागाच्या सतर्कतेच्या सूचना
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव शिवारात सोमवारी (दिं.११रोजी) पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घालून दत्त पाटी परिसरातील किशोर सुधाकर घुगरे यांची शेळी फस्त केली. तर, सावंत वस्ती येथे कारभारी बाबुराव भुसे यांच्या दोन वर्षाच्या वासराच्या मानेवर तसेच पाठीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामूळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सावंत वस्तीवरील कुत्र्यांच्या भुंकण्याने रहिवासी जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती व घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, श्री. घुगरे व श्री.भुसे यांनी याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला कळविल्याने पाथर्डी परिक्षेत्राचे वनविभागाचे कर्मचारी आर. एम शिरसाठ व ए.एम.धनवट यांनी घटनास्थळाची समक्ष पाहणी करून पंचनामा केला.सततच्या पावसाच्या रिपरिपीमुळे दत्तपाटी व सावंत वस्ती परिसरात बिबट्याच्या पायाचे स्पष्ट ठसे आढळून आले. त्यामुळे वाडी - वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. स्वतःची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
0 टिप्पण्या