चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:- संत रविदास महाराजांनी उच्च-निच्च भेद न मानता, समानतेची शिकवण देऊन समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी समाजप्रबोधन केले. भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच भगवंत राहत असल्याची त्यांची धारणा होती. देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना आज खर्या अर्थाने समानतेची शिकवण देणारे संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज असल्याचे प्रतिपादन चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी केले.
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साळवे बोलत होते. प्रारंभी सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच मधुररंजनी सभागृहात (मोरया मंगल कार्यालय शेजारी) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संत रविदास महाराजांच्या जीवनचरित्रावर बोलताना ह.भ.प. अमोल महाराज गांगर्डे म्हणाले की, मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ बनतो. रविदास महाराज आपल्या भक्ती व कर्तृत्वाने महान झाले. संपुर्ण जगात रविदास महाराजांचे अनुयायी असून, त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करीत असल्याचे सांगून, त्यांनी संत रविदास महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी समितीचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे, प्रदेशाध्यक्ष गोकुलदास साळवे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, शहराध्यक्ष विश्वनाथ निर्वाण, महिला जिल्हाध्यक्षा मिनाताई गायकवाड, शहराध्यक्षा गीताई कांबळे, बापूसाहेब देवरे, विठ्ठल जयकर, अभिजीत खरात, नंदकुमार गायकवाड, रामकिसन साळवे, देविदास कदम, तुळशीराम उदमले, विजय गुजर, सागर बोरुडे, कल्याणराव सोनवणे, यश कांबळे, जालिंदर कांबळे, पोपट बोरुडे, बाळकृष्ण जगताप, बाळकृष्ण जगताप आदी उपस्थित होते.
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चित्रकार सुरेश तेलोरे यांना कला गौरव व निखिल पवार यांना शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरातील चर्मकार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या