एकाच वेळी महाराष्ट्रभर आंदोलनाचा हजारे यांचा इशारा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय नुकताच घेतला. तो राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी असून येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक असल्याने या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठवले आहे.
त्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने ४ पानी पत्र पाठविण्यात आले आहे. किराणा
दुकानात वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बेमुदत
उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. भ्रष्टाचाराला
आळा घालण्यासाठी माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार,
दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, जनतेची सनद, लोकपाल कायदा, ग्रामरक्षक
दल कायदा यासारखे भ्रष्टाचाराला आळा घालणारे विविध १० कायदे वेगवेगळ्या सरकारवर
जनशक्तीचा दबाव निर्माण करून अण्णानी सरकारला करायला भाग पाडले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात हजारे म्हट्ले
आहे की, पन्नास वर्षापूर्वी आमच्या गावात पस्तीस दारूभट्ट्या होत्या. आज २२ वर्षात
गावात कोणत्याही दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा विक्रीला नाही. आणि सरकार मात्र
सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय करते. अविवाहित राहून गाव,
समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करण्याचा निर्णय घेतला. आज
पर्यंत ८४ वर्ष वयाच्या आयुष्यात फक्त गाव, समाज आणि देशाची
सेवा करीत आलो आहे. विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत. ही दोन्ही कामे केल्याशिवाय गाव, समाज,
आणि देशाला उज्वल भविष्य मिळणार नाही.
राज्यात उपोषण होईल त्यावेळी कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे
सर्वांनी उपोषण करू नये. तुम्ही विवाहित असल्यामुळे अण्णा हजारेची उपोषणाची नक्कल
करून चालणार नाही..राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या
वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संघटना
संपर्कात येत आहे. लवकरच राज्यातील अशा संस्था आणि संघटनांनी कोणत्याही पक्ष
पार्टीच्या विरोधात आंदोलन न करता समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या
मार्गाने आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा काय असावी. आंदोलन कुठपर्यंत करावे
याचा विचार करण्यासाठी राज्यातील काही संस्था आणि संघटनांची बैठक आम्ही राज्याच्या
वेगवेगळ्या विभागात घेण्याचा विचार करीत आहोत. सुपरमार्केट
आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण
महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन केले जाईल असेही हजारे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला
दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार
नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे
त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे
लोकशाही नव्हे असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या