लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी: पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करुन लावण्यात आलेल्या बायोडिझेलच्या
मुद्दे मालाच्या टँकरमधून चोरी करणाऱ्या एका पोलिसासह पाच आरोपी विरुद्ध पाथर्डी
पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपी मध्ये एका
पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस
कॉन्स्टेबल दीपक शेंडे व भागवत काशिनाथ चेमटे (रा. शिंगोरी ता. शेवगाव) या दोघांना
पोलिसांनी अटक केली आहे.
काल पहाटे पाचच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या या
टँकर शेजारी भागवत काशिनाथ चेमटे,
असिफ रफिक शेख, दीपक
आरोळे व पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेंडे यांनी दुसरा टँकर (क्र. एम एच १४ ए एच ६४६८)
आणून लावला. व पोलिसांनी पकडलेल्या टँकरमधील डिझेल ते इंजिन लावून दुसऱ्या टँकर मध्ये
भरू लागले. इंजिनचा आवाज ऐकूण पोलीस नाईक ईश्वर गर्जे व इतर कर्मचारी टँकरच्या जवळ
आले असता त्यातील शेख व आरोळे हे पळून गेले तर शेंडे हा पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला. पोलिसांनी चेमटे यास पकडले मात्र त्यानंतर
परत पळून गेलेले शेख व आरोळे हे पोलीस स्टेशनच्या आवारात परत आले व त्यांनी चेमटे याला पोलिसांशी झटापट करत त्यांच्या
तावडीतून परत सोडवून नेले. भरपहाटे हा सिनेस्टाईल थरार सुमारे अर्धा तास चालला
होता.
घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे आले व त्यांनी
एक पथक पाठवून पुन्हा चेमटे याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. चेमटे याने पंपचालक विष्णू बाबासाहेब ढाकणे याच्या
सांगण्यावरून आम्ही हा प्रकार केला असल्याचे सांगितल्यानंतर गर्जे यांनी चेमटे,
शेख,आरोळे, विष्णू ढाकणे
व शेंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
डिसेंबर महिन्यात तालुक्यातील शेकटे शिवारात रात्रीची गस्त घालताना पोलिसांनी
डिझेलने भरलेले दोन टँकर पकडून पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावले होते. यातील काल
पहाटे एका टँकर मधून (क्र. एम एच ४६ बी एफ ०७३८ )
पोलीस कॉन्स्टेबल दिपक शेंडे व त्याच्या साथीदारांनी टँकर शेजारी टँकर उभा करुन
जप्त केलेला सरकारी डिझेलचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रयत्नामुळे कुंपणच शेत
खाते असा काहीसा प्रकार घडला आहे. याची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे.
0 टिप्पण्या