लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: सध्या नगर जिल्ह्यातील नगर,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत या भागातील ज्वारी काढणीच्या कामाने जोर धरला असुन इर्जिकची परंपरा खंडीत झाली आहे तर ज्वारीच्या शिवारात गुजणारा भलरीचा सुर ही लोप पावला आहे . मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिके कणसासह काळवंढली आहे . मोत्यावाणी दिसणारे ज्वारीचे दाणे काळे ठिकूर पडले असून कडबाही काळा पडला आहे . ग्रामीण भागात ज्वारी काढणीच्या घातली जाणारी वातावरणाच्या बदलाचा फटका ज्वारी पिकांना बसला असल्याने उत्पन्नात मोठी घट येणार आहे . त्यामुळे ज्वारी पिके काढणीला महाग झाली आहेत .
वेळच्या वेळी पावसाने साथ दिल्याने ज्वारीची जोमदार पिकांनी शिवार बहरले होते . मात्र मध्यंतरी दररोज बदलणाऱ्या वातावरणाने ज्वारीच्या पिकांना मोठा तडाखा बसला . कणसामध्ये मोत्यावाणी भरलेले टपोरे दाणे दिसत असतानाच वातावरणाचा फटका बसला . कणसातील दाणे काळवंठले तर कडबा ( वैरण ) काळी पडली . यंदा ज्वारीची पेर कमी असल्याने ज्वारीला चांगला बाजार भाव मिळणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती . पण वातावरणाने घात केल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले . शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला . सध्या तालुक्यात ज्वारीची काढणी सुरू झाली असून मजुरांच्या वाढलेल्या रोजंदारीने शेतकरी हतबल झाला आहे .
ग्रामीण भागात ज्वारी काढणीसाठी शेतकरी मित्र ,नातलग यांना एकत्र बोलवून सहकार्याच्या भावनेतून ज्वारीची काढणी करत होता . याला इर्जिक म्हटले जात होते . यामधून शेतकऱ्याची आर्थिक बचत होत होती . मात्र काळाच्या ओघात ही इर्जिकची परंपरा लोप पावली अन् मजुरांकडून ज्वारी काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली . वाढत्या महागाईने मजुरांची रोजंदारीही वाढली तशी मजुर टंचाईही वाढली . वातावरणामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले असून शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च भरमसाठ वाढला शेतकरी हतबल आहे.
0 टिप्पण्या