लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत: कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर दडपशाही
करून उमेदवारी अर्ज काढून घेण्यास भाग पाडले आहे,
अशी टीका करत माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथील ग्रामदैवत
गोदड महाराज मंदिराच्या बाहेर मौन करत धरणे आंदोलन केले.
कर्जत नगरपंचायत निवडणूक कडे संपूर्ण
राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार व माजी
मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ही निवडणूक होत आहे. विधानसभा
निवडणुकीनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण 17 पैकी 13 जागांसाठी
निवडणूक होत आहे. यामध्ये काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
अद्यापही महाविकासआघाडी याचा निर्णय झालेला नव्हता. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे
काही उमेदवार अर्ज माघार घेण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना अगोदरच अज्ञातस्थळी
नेण्यात आले होते.
असे असताना सकाळी भाजपचे शहराध्यक्ष
वैभव शहा यांच्या पत्नी राखी शहा या विद्यमान भाजपच्या नगरसेवक आहेत. त्यांनी
उमेदवारी अर्ज कोणालाही न सांगता परस्पर काढून माघार घेतली. यामुळे खळबळ उडाली. यानंतर
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 2 मधील विद्यमान नगरसेविका अनिता अजिनाथ कचरे या
उमेदवारी अर्ज काढण्यासाठी आल्या होत्या. हे समजताच नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात
भाजपचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी एकत्र आले. व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये अर्ज माघार घेण्यावरून राष्ट्रवादी
काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यानंतर त्या ठिकाणी पोलीस
कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले.
दरम्यान माजी मंत्री राम शिंदे देखील
त्या ठिकाणी पोहोचले. व त्यांनी निवडणूक अधिकारी यांना अशा पद्धतीने दबावतंत्र
वापरून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी अर्ज काढले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी
व्यक्त केली. एवढ्या प्रचंड वादानंतर देखील भाजपच्या नगरसेविका अनिता कचरे यांनी
उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लंकाबाई देविदास
खरात या बिनविरोध विजयी झाल्या.
या घटनेनंतर माजी मंत्री राम शिंदे हे
संतप्त झाले व त्यांनी कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज मंदिराच्या समोर आमदार
रोहित पवार यांच्या माध्यमातून व अधिकारी हे भारतीय जनता पक्षाच्या
कार्यकर्त्यांवर दडपशाही करत असून लोकशाही पद्धतीने निवडणूक होत नसल्याबद्दल मौन धारण करून धरणे आंदोलन सुरू केले
आहे. रात्री उशिरा हे आंदोलन सुरूच होते.
0 टिप्पण्या