Ticker

6/Breaking/ticker-posts

भोयरे पठारला धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद..!

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

भोयरे पठार (ता.नगर) : नगर तालुक्यातील भोयरे पठार गावच्या परिसरात मागील आठवड्यापासून पाळीव प्राण्यांवर हल्ले करत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात मंगळवारी (दि.16) पहाटे अडकला. 

तालुक्यातील भोयरे पठार व हिवरे बाजार या दोन गावांच्या सिमावर्ती भागात मागील आठवड्यापासून सातत्याने बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याने काही पाळीव कुत्रे व प्राण्यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते. सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असतानाही बिबट्याच्या भितीपोटी शेतकरी शेतात जाण्यास धजावत नव्हते.. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

 वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल गावडे, वनरक्षक आर. सी. अढागळे, सुरक्षा रक्षक सखाराम येणारे यांच्यासह पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा वावर असलेल्या शेतात पाच दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. या पिंजर्‍याकडे बिबट्या यावा यासाठी भक्ष म्हणून पिंजर्‍याजवळ शेळी बांधण्यात आली होती. मंगळवारी (दि.16) पहाटे 5 च्या सुमारास सदरचा बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजर्‍याजवळ आला व पिंजर्‍यात अलगद जेरबंद झाला. त्यानंतर सकाळी वनविभागाच्या पथकाने सदरचा पिंजरा ताब्यात घेऊन नगरच्या विभागीय कार्यालयात आणला. या बिबट्याला दूर जंगलात त्याच्या आधीवासात सोडण्यात येणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.

 वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाल्यामुळे भोयरे पठारसह परिसरातील गावांमधील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून बिबट्याच्या भितीपोटी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्यास घाबरणार्‍या शेतकर्‍यांना आता दिलासा मिळाला असल्याचे भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या