Ticker

6/Breaking/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड्णुकीचा बिगुल वाजला

 


*नगर बाजार समिती वगळता

*जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांच्या निवडणुका १७ जानेवारीला

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अ.नगर : राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्यातील, मुदत संपलेल्या तसेच २३ ऑक्टोबर पर्यंत मुदत संपणार असलेल्या बाजार समित्यांचा मतदार यादी व निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जाहीर केला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन वर्षाच्या दुसऱ्या पंधरवड्यात, १७ जानेवारी २०२२ रोजी होणार आहेत. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी होणार आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत १७ आक्टोबर २०२१ रोजी संपणार असल्याने पारनेर बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर १३ बाजार समित्यांच्या निवडणुका १७ जानेवारी रोजी होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणार असल्याने नगर बाजार समितीची निवडणूक होणार नाही.

 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव गिरी यांनी निवडणुकीसंदर्भात सविस्तर आदेश काढला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी १६ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. निवडणूक अर्जाची विक्री व अर्ज स्वीकारणे १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २१ या कालावधीत होणार आहे. छाननी २३ डिसेंबर रोजी तर वैध उमेदवारी अर्जांची यादी २४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.२४ डिसेंबर २१ ते ७ जानेवारी २२ या कालावधीत अर्ज मागे घेता येतील.निवडणूक चिन्हांसह अंतिम मतदार यादी १० जानेवारी २२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. गरज पडल्यास १७ जानेवारी रोजी मतदान होईल व १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

 ज्या बाजार समित्यांची मुदत संपली आहे त्या बाजार समित्यांच्या मतदार याद्या ३० सप्टेंबर २१ या अहर्ता दिनांकावर तयार कराव्यात. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ११ आक्टोबर ते २२ आक्टोबर २१ या कालावधीत जिल्हा उपनिबंधक व गटविकास अधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजार समिती सचिवांकडे २५ आक्टोबर २१ रोजी सदस्य सूची सुपूर्द करावी.सचिवांनी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २१ या कालावधीत प्रारूप मतदार यादी तयार करून ८ नोव्हेंबर २१ रोजी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावी.या मतदार यादीवर हरकती आक्षेप मागवून व त्यावर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ६ डिसेंबर २१ रोजी प्रसिद्ध करावी असे यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या